खरेतर ते निरोप घ्यायला आले होते बराच वेळ ते एकत्र थांबले, खूप काही बोलले नाहीत
ते त्यांच्या आवडत्या नेहमीच्या ठिकाणी, तळ्याकाठी नि:शब्द बसून होते
त्याने आपला हात तिच्या कोमल हातावर ठेवलेला होता
त्या स्पर्शातून त्यांची स्पंदने वाहत होती, शेवटी वेळेची मर्यादा सरली
ते दोघेही यंत्रवत उठले, त्यानं तिच्याकडे डोळे भरून पाहिले
तिच्या डोळ्यांत पाणी दाटलं होतं,
तिचं अवघडलेपण कमी व्हावं म्हणून त्यानं नजर दुसरीकडे वळवली
तो मोका साधून 'निघावे लागेल..' हे दोनच शब्द बोलून उसासे टाकत ती निघून गेली
ती गेली त्या दिशेला नजर खिळवून तो बराच वेळ तिथे रेंगाळला,
दिवस मावळला तेव्हा भानावर आला
मग तो देखील तिथून निघाला,
ती गेली त्या वाटेनेच बरेच अंतर जाऊन
मग वळणावरच्या चौकानंतर त्याच्या घराचा रस्ता लागत होता,
काही मिनिटांचे ते अंतर त्या दिवशी त्याला कोसो दूर वाटले
रस्त्याने जाताना वाटेत त्याला एक रडवेलं झालेलं स्वप्न भेटलं
जे त्याच्या ओळखीचं होतं, त्याची वाट पाहत ते रस्त्याच्या कडेला थांबलं होतं
त्याला भेटताच ते हमसून हमसून रडलं
त्याला तो विचारत होता, "असं कसं काय झालं?"
तितक्यात त्याच रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या अवजड ट्रकचा कर्कश्श हॉर्न ऐकू आला
काही अंतर पुढे जाऊन करकचून ब्रेक दाबत ट्रक थांबला, बघे गोळा झाले.
अरेरे तरुण पोरगा होता वाटतं, पण रस्त्याच्या मधोमध असा कसा उभा होता?
दरम्यान काही क्षणांतच त्या रडवेल्या स्वप्नाला त्याचं हवंहवंसं ओळखीचं दुसरं स्वप्न भेटलं,
आसवल्या डोळ्यांनी दोन्ही स्वप्नं एकमेकांच्या बाहुपाशात विसावली!
बघ्यातला एकजण सांगत होता वळणावरच्या पुढच्या चौकातही असंच घडलंय
लोक हळहळत होते नि स्वप्नांच्या शेवऱ्या हवेत उंच उंच जात होत्या..
- समीर गायकवाड

No comments:
Post a Comment