Wednesday, 17 December 2025

पूर्वी एक पक्षी गझल गायचा..



पूर्वी एक पक्षी गझल गायचा, 
चार पाच झाडे ती ऐकत राहायची.

ज्यांच्या बद्दल बोललं जायचं, 
ती माणसंही मोजकीच असायची.

रात्र होताच फुल उमलायचे, 
चौदिशांना सुंगंधाची नजर असायची...

आताशा सांज विलक्षण मौन असते, 
वारा शोधित फिरतो झाडांना

विराणी खोल घुमते अंधारी, 
पक्षांची ती गझल आता कशी ऐकायची?

Friday, 12 December 2025

वळणावरती झाड उभे..

 


वळणावरती झाड उभे कलंडूनी आकाशाला
घरट्यामधले पक्षी गाती सावलीच्या गीताला

भरदार बुंधा, हिरवी कोवळी पाने शेंड्याला
उनाड वारा अलगद झोंबतो नव्या कोंबाला

टक्क दुपारी जित्राब अज्ञात येते आसऱ्याला
भिंगुळली उन्हे रेंगाळती पानांच्या पदराला

अंगाई अंधाराची रात्रीस निजवते पानांला
स्वप्नी दिसे आर्तवन पानमिटल्या झाडांला

होता सुर्योदय पाने हसरी वंदिती विधात्याला
भुरळ झाडाच्या प्रेमाची नित्य पडते मातीला!

वळणावरती झाड उभे कलंडूनी आकाशाला
सावलीत निजे कुणी कुऱ्हाड घेऊनी उशाला

- समीर गायकवाड

Saturday, 6 December 2025

प्रिय बाबासाहेब!


आपल्याकडे एक बरे असते,
एकदा का माणूस गेला की त्याला पुतळ्यात चिणतात.
त्याच्या विचारांना विशालकाय स्मारकात दफन करतात.

नुसताच उदोउदो करत महामानव नावाचं दंभसूक्त रचतात.
बाबासाहेब तरी याला कसे अपवाद राहतील?
उगाच ते या देशात जन्मले!

दलितांनी त्यांना अस्मितेच्या निळाईत बुडवले तर
उच्चवर्णीयांनी आपला पोटशूळ दडवत
दरसाली खोटा कुर्निसात केला.

Thursday, 4 December 2025

बायको आधी गेली की पुरुष खचतात



उतारवयात बायको आधी गेली की पुरुष पुरते खचतात. 
ज्या पत्नीला मनसोक्त सहवास दिलेला नसतो
तिच्या आठवणींनी व्याकूळ होतात.
हरेक क्षणासाठी पस्तावत राहतात.
तिच्याविषयी त्यांना उघड बोलताही येत नाही,
नुसते घुसमटत जातात
उदास कसनुसे बसून राहतात

खिन्न कोरडं हसतात, इकडं तिकडं शून्यात नजर लावून बसतात
तिच्या चीजवस्तूंना लपून छपून हाताळतात,
तासंतास न्याहाळतात
आस्तिक असले तर देव्हाऱ्यातून बाहेर डोकवताना
आसवले डोळे पुसतात
जीवनातल्या सगळ्या लढाया थांबवत जातात
एका जागी राहणं अधिक पसंत करतात!

तोडलेल्या झाडाचे प्रतिबिंब ..

दूर कुठे तरी एकट्याने मरून पडलेल्या देहपंख विद्ध झालेल्या पक्षाच्या भिंगुळल्या डोळ्यात बारकाईने निरखून पाहिले तर तोडलेल्या झाडांचे थिजलेले प...