Thursday, 15 November 2018

पाकोळ्या


रात्री ज्या मैफलीत बसलो होतो तिथल्या एका तप्त झुंबराचा तुकडा उडून समोर पडला
त्यावर पडलेल्या कोवळ्या सूर्यकिरणांनी तिच्या दमलेल्या चेहऱ्याला हळू पुसून घेतलं
आरक्त झालेल्या तिच्या गालावरचा लालिमा मग अधिकच खुलून उठला.
तेव्हढयात
रात्रभर जळत राहीलेल्या मेणबत्तीच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या मेणात पडलेल्या 
एक-दोन पाकोळ्यांनी सर्व ताकद एकवटत पंख हलवून तिच्या सौंदर्याला दाद दिली
आणि मगच ते जीव निमाले.


- समीर गायकवाड 

Wednesday, 14 November 2018

दिक्कालाच्या सीमेवर


सोसाट्याच्या वाऱ्यानं झाडाची पानं न पानं उपसून काढली
डेरेदार जुनाट झाड मुळासकट उपसून निघालं
फांद्यावरच्या घरट्यांसकट कोसळलं
रणरणत्या उन्हांच्या साक्षीत गहिवरलेल्या मातीने
गर्भातली काही मुळं घट्ट धरून ठेवली.

दिवस काही असेच शुष्क गेले
एक अवकाळी पाऊस काय झाला
मातीच्या गर्भातल्या कोमेजल्या मुळांनी
जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
आता लवकरच मातीच्या आभाळभर अस्मितेनं
एक अंकुर फुलून येईल.

अंधारलेल्या दिक्कालाच्या सीमेवर
तेव्हा मी उभा असेन औक्षणासाठी
डोळ्यांचे दिवे घेऊन!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 

स्वप्न...


विस्तवात चुलीच्या तेवता स्वप्न तलम 

भाकरीच्या चंद्रात मन झिरपते अल्वार .

परातीतल्या पिठात ओघळतो नितळ काळ,

मायेच्या पीठभरल्या हाती हरपते भूक.
शाडू रंगल्या भिंती जणू जरीच्याच तार,
चंद्रमौळी छपराला देती भुईतून आधार.

कवडशात तिथल्या पाझरे सारेच हे सुख,

शेण सारवल्या भुईची मऊ किती मखमल,
टेकताच पाठ जणू फिरे मायेचाच हात.
डोळ्याच्या ओलीतून मायची छबी नाही जात..

येई परत फिरूनी जीव माझा रे तिथं,

एका खोलीच्या संसारात जीव रमतो जिथं
सारी सुखं नांदती माझ्या विठ्ठलासंगं तिथं

- समीर गायकवाड.

Tuesday, 6 November 2018

काजळ


उगीच संध्याकाळ होते
ती येणार नाही हे माहित असूनही
फिरून फिरून तिचीच आठवण घेऊन परतते
मनाच्या भिजलेल्या उंबरठयावर थबकते.
मनाचं दार उघडलं नाही तरी या आठवणी हटत नाहीत.
हळूहळू संधीप्रकाश विरत जातो आणि
अंधार तिच्या डोळ्यातलं काजळ घरभरात प्रसवत राहतो
मग तिला अनुभवता येतं !

आताशा मी तिची आठवणच काढत नाही,
बस्स सांज व्हायची वाट पाहतो...

- समीर गायकवाड

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...