Tuesday, 24 September 2024

चार कावळे (चार कौए)


खूप नव्हते, होते फक्त चार कावळे काळे
त्यांनी हे निश्चित केलं की उडणारे पक्षी सारे

त्यांच्याच ढंगाने उडतील, थांबतील, खातील आणि गातील
ते ज्याला उत्सव घोषित करतील तोच सारे साजरा करतील
 
कधी कधी जादू होऊन जाते विश्वामध्ये
दुनियाभरचे गुण दिसतात अवगुण्यामध्ये!

हे चार अवगुणी, मोठे मुकुट शिरोमणि झाले
गिधाड, गरुड आणि बाज यांचे सेवक झाले

हंस, मोर, चातक, चिमण्या सारे खिजगणतीत
हात बांधून सारे उभे राहिले विनम्र मुद्रेत

हुकूम झाला, चातक पक्षी गुंजारव करणार नाहीत
'पिहू पिहू' सोडून त्याऐवजी काव काव गातील

वीसेक तऱ्हेची कामं दिली गेली चिमण्यांना
खाणंपिणं, मौज मस्ती बिनकामाच्यांना

कावळ्यांचं असं फावलं की पाचही बोटे तुपाशी
मोठे मोठे मनसुबे प्रसवले त्यांच्या मनाशी

उडण्याचेही नियम असे काही बदलले
की उडणारे फक्त जागीच बसून राहिले

पुढे काय घडलं, सांगणं फार कठीण आहे
हा काळ कवीचा नसून चार कावळ्यांचा आहे

उत्सुकता वाटलीच तर यावे माझ्या घरी
गोष्ट ही मोठी, थोडक्यात कशी ऐकवावी

प्रसिद्ध कवी भवानीप्रसाद मिश्र यांच्या विख्यात 'चार कौए' या कवितेचा हा स्वैर मराठी अनुवाद. आज हिंदी दिवस. हिंदीवर प्रेम करणाऱ्या सर्व बहुभाषिकांना हिंदी दिनाच्या सदिच्छा!

- समीर गायकवाड

अर्थ बेगडी उत्सवाचे!



होती कुंद पावसाळी पहाट नि हवाही बऱ्यापैकी स्वच्छ
खिडकी बाहेर डोकावलं तर चेहरा ओळखीचा दिसला.
हा तर सेलिब्रिटींचा तारणहार, इकडे कसा काय आला?
"बाप्पा! अहो बाप्पा! इकडे पाहा!" हाक मारली त्याला!

म्लान होता चेहरा, नेत्रही सुकलेले; देहबोली नैराश्याची
"गर्दी संपली का मांडवातली?" प्रश्न ऐकता नजर झुकली
"आता नसतो मी त्या दरबारी, तिथे वसतो धनिकांचा 'राजा'
शोभिवंत मुर्ती नि उंची आरास, श्रीमंतांच्या पायी गालिचा
सच्च्या भक्तांवर जबरदस्ती, कुठवर पाहू हा भाव दुजा

दमलो आता, कानही किटले! वाटते, नको ती प्राणप्रतिष्ठा
तसाही नसतो मी या मांडवां, वाटते प्रयाण करावे कैलासा
मग स्मरतात सच्चे गणेशभक्त, उरलो त्यांच्या भक्तीपुरता
काय करावे सुचेना, उत्सवाआड बाजार मांडलाय नुसता
यासाठी का केला होता, अट्टाहास सार्वजनिक उत्सवाचा

लालबागसारखे मांडव कधीच सोडलेत, भटकतो वणवण
तुमच्या बालपणीचा बाप्पा कधीच हरवलाय, उरले स्मरण
निरागस किशोर होतो मीही नाचायचो, गायचो तुमच्यासवे
आता कोंडूनि मांडवांत सोबत हिडीस गाणी नि हैदोस नवे
जीव लागत नाही आता, रडू जुन्या आठवणींनी कोसळते

कुठे गेला तो उत्सव, कुठे गेले ते पावित्र्य? काय झाले त्यांचे
शांतताही नसते; स्तोम किती माजवले तुम्ही मिरवणुकांचे!
काय ते आविर्भाव नि किती तो आवाज, जीव गेले कैकांचे
माझीही वर्गवारी केलीत, नकोत फेटे मला खोट्या मानाचे
मन रमत नाही आता, वेध लागलेत मायबाप उमा महेशाचे

रजा घेण्या करिता, हितगुज करतोय जुन्या गणेशभक्तांशी
निघतो मी आता, तुमचे हे दोषभारित जग सांभाळा तुम्ही
असेन नित्य तुमच्या हृदयी, नि जळीस्थळी काष्टी पाषाणी
मात्र असेल अट एक, असेल ज्याला चाड नैतिक मूल्यांची
असेल किंमत सृष्टीची मानवतेची, राहीन तिथेही निवासी."

बोलून इतके तो गेला निघून, खांदे झुकवून संथ चालीने!
दमला असेल खूप तो, काय नसेल सोसले असेल त्याने
झाला असेल कितीदा खजिल, थिजला असेल घुसमटीने
गेली कैक वर्षे होता तगून, सच्च्या भावभक्तीच्या ओढीने
नुरली आता स्नेहार्द्रता, विटला असेल तो बाजारीकरणाने

सहनशक्तीचा त्याच्या न पाहावा अंत, आवतण अनर्थास!
सरली आस्था नुरली स्नेहर्द्रता, अर्थ काय बेगडी उत्सवास!

- समीर गायकवाड

Tuesday, 15 August 2023

हृदयस्थ दरवळ ..





त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती,
'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात.
बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात.
तिने टेक्स्ट मेसेज केलेला -
'काहीही अडचण न सांगता नक्की ये... '


जगभराचे ओझे बाजूला सारून
तो वेळेवर येऊन थांबलेला.
घामेजलेल्या चेहऱ्याने.
लांबूनच ती येताना दिसली.
हायसे वाटले तरीही
घशाला कोरड पडली होतीच.
घाईघाईने रस्ता ओलांडून ती समोर आली.

Monday, 3 July 2023

बाप होणं सोपं आहे! पण..

 वडिलांच्या अनेक गोष्टींचा राग यायचा.

आता 'त्या'च गोष्टी मी अगदी तितक्याच सहजतेने करतो!
मग त्या काळातल्या संतापाची आठवण झाली की
अपराधी भावना दाटून येते.
आईच्या मायेचे गोडवे आयुष्यभर गायलेत
मात्र वडिलांच्या मायेचे काय झाले याचे उत्तर आता अलगद गवसते आहे.

जन्मभर आईची माया तिच्या कुशीत शिरून अनुभवलेली
पण बाप मात्र घाबरूनच अनुभवलेला.
धाक, दरारा, दडपण यात बाप विरत गेलेला आणि
मी ही त्याच प्रतिमेत गुरफटत गेलेलो.
खरं तर आता कळतं की
वडिलांची माया देखील आईसारखीच स्नेहार्द्र होती,
त्यातही कोमलता होती
पण पाकळ्यात अडकलेला भुंगा जसा कोषात गुरफटून जातो
तसं वडिलांचं झालेलं असतं.

मखमल

आज्जा सांगायचा, "कधी बी गावाकडं आलं की आधी मला भेटायचं.."

आता तो नाहीये, त्याला जाऊन दशके लोटलीत, तरीही तो भेटतच असतो!
गावाकडच्या रस्त्यांनी असलेल्या घनदाट झाडांच्या सावलीत
पांदीतल्या शांत शीतल आमराईत, गावंदरीच्या जुनेर घालमेलीत!

आज्जा भेटतो वेशीवरल्या मंदिराच्या गाभाऱ्यात, शिवंवरल्या पिंपळांच्या पारंब्यात
शेताच्या वाटंवरल्या डोहात अन् गव्हाच्या कोवळ्या लोंब्यांत

घरी गेलं की आज्जा दिसतो ढेलजंत, पडवीत तर कधी दिसतो अंगणात,
सारवण केलेल्या भिंतींना टेकून बसलेला तर कधी पोत्यांची चवड रचणारा

तुळशी वृंदावनात तेवणाऱ्या पणतीच्या मंद ज्योतीत त्याचा चेहरा तरळतो
कंदिलाची काच पुसताना, आरशात डोकावताना, विहिरीत उतरतानाही तो दिसतो

जुंधळ्याला लगडलेल्या चांदण्यांत तो चमकतो, गोठ्यातल्या गायीच्या डोळ्यांत पाझरतो
बांधावरल्या बोरीबाभळींच्या काट्यात वसतो, दावणीतल्या मूक वेदनांमध्ये झुरतो

आज्जा नांगराच्या फाळातून मातीत शिरतो, कंच पिकांतून उगवून येतो
हिरव्या पिवळ्या कोंबांच्या देठांत राहतो, कळ्यांची फुले होताना उमलून येतो

आज्जा नाही असा परीघ नाही,
आज्जा काळजात असतो आणि नातीला लावलेल्या काजळातही असतो
रातीला बाजंवर झोपी गेलं की बिलोरी चांदण्यांतुन खाली उतरतो,
अलगद गाल कुरवाळतो,
त्याच्या हातावरची मखमल गालावर ठेवून पहाटेस निघून जातो!

आज्जा पिढ्या न पिढ्या जिवंत असतो!
फक्त नावं बदलत जातात, माणूस तोच असतो!

- समीर गायकवाड

Wednesday, 31 May 2023

मौनातला संवाद

अंधार बऱ्यापैकी गडद झाल्यावरसोसायटीच्या बाहेर मेन रस्त्यावरची वर्दळ कमी होते
एरव्ही कंजेस्टेड वाटणारा रस्ताही भलामोठा वाटू लागतो.
जिथे स्ट्रीटलाईटचा उजेड क्षीण झालेला असतो
त्या भागात रस्त्यालगतच्या फुटपाथवर 'ते' दोघं नकळत येऊन बसतात.
दोघेही असतात धुमसत अंतर्बाह्य !

वन नाहीतर टूबीएचकेच्या खुराड्यात रोजच उडत असतात खटके
कधी तिचे तर कधी त्याचे,
कधी कामावरून तर कधी पैशाच्या कडकीवरून
तर कधी घरातल्याच कुणाशी तरी वाद झाल्यावरून नाहीतर रोजच्याच टोमण्यांवरुन!
दोघे परस्परांना वैतागलेले असतात,
नातं अक्षरशः नको नकोसे झालेलं असतं.
ते हमरातुमरीवर येतात
मात्र आपला आवाज कुणालाही ऐकू जाणार नाही याची दक्षता घेत असतात.
खूप वादावादी होते.

Tuesday, 28 March 2023

ओळखीच्या गल्लीतले हरवलेले घर..

sameerbapu


         ओळखीच्या गल्लीतले हरवलेले घर

काही गल्ल्या ओळखीच्या असतात, तिथली काही घरे मेंदूत घर करून असतात.
त्यातही एखादं घर खास असतं.
तिथून कधी येताना जाताना उगाच शोध घेत असते नजर,
आपलं तिथं कुणी आता राहत नाही हे ठाऊक असूनही!
आपण रेंगाळतो,
नजरेत साठवतो तिथले दरवाजे, खिडक्या नि अंगण,
सुकून गेलेल्या वेली अन् हिरमुसलेली झाडं!
तरीही आपल्याला वाटतं की उघडा राहील दरवाजा कधी तरी
अन् खुली असेल खिडकी
फुलून येतील वेली नि झाडेही होतील हिरवीकोवळी!

पण असं घडत नाही.
दिवस वेगाने ढळत जातात..
ते घर काही केल्या पहिल्यासारखं भरभरुन नांदत नाही
पण मन मात्र भरुन येतं, पुन्हा पुन्हा!
डोळ्यांच्या ओलेत्या कडांत त्या घरातली माणसं तरळत राहतात,
आयुष्यभर!
______________________________________________

'त्या' गल्लीतून येणारा वारा माझे घर शोधित येतो
अंगणातल्या निशिगंधाची दोन फुले खिडकीत टाकून जातो
त्या फुलांना 'त्या' माणसांचा दरवळ असतो!

कधी गेलोच 'त्या' घरी
तर न विसरता तिथल्या आरशात डोकावतो
प्रतिबिंबात माझ्यासोबत 'ती' माणसंही दिसतात
आरसा ओळखीचे हास्य करतो नि माझे डोळे पाणवतात!
_________________________________________________

'त्या' घराच्या अंगणातल्या झाडांत रोज रात्री चंद्रमा वितळतो
घर पुन्हा आबाद व्हावे म्हणून आर्जवं करतो
हसणारी बहरणारी माणसं परतून यावीत म्हणून
चांदण्याही मुक्कामी राहतात, सकाळी त्यांची प्राजक्तफुले होतात!
_________________________________________________

सासरी गेलेल्या स्त्रीला तिच्या माहेरच्या घरासारखं
दिसणारं घर कुठे जरी दिसलं तरी
अख्खं माहेर तिच्या डोळ्यात टचकन गोळा होतं!
काळाच्या एका टप्प्यावर तिने मागे सोडलेले घर
वर्तमान नि भविष्यातही तिची सोबत करत राहते,
ती पुन्हा पुन्हा त्याची अनुभूती घेत असते!
____________________________________________

'तिला' निरोप दिला तेंव्हा ठाऊक नव्हतं
की, तिच्यासोबत घराचे घरपण देखील जाणार आहे!
काही माणसं घरातून गेली की
त्या घरांचे चैतन्य हरवते. उरतात भिंती, छप्पर आणि
आपल्या आठवणींचे उदास पारवे!
_______________________________________________

'त्या' घराची भिस्त आता पाहुण्यांवर असते
कुणी आलंच हिरवंकोवळं बहारदार
तर घरपणही परतलेलं असतं!
तेव्हढाच शिडकावा पुरेसा असतो
जिंदगानीशी मुकाबला करायला!

आपल्याला ठाऊक असतं की,
कधीकाळी 'त्या' घराने आणि 'तिने'ही आपली प्रतिक्षा केली होती
जेंव्हा हे कळते तेंव्हा आयुष्यभर आपण शोधत फिरतो
खरे तर आपल्या पाठीला तिचेच डोळे असतात
मागे वळून पाहताना आपण उगीच रडत नसतो!
______________________________________________

आताशा 'त्या' गल्लीत टुमदार घरे असतात
घरांना नावेही असतात.
कर्त्या माणसांची पदेही नेमप्लेटवर लिहिलेली असतात
झाडे असतात, पक्षांचे पिंजरे असतात
'कुत्र्यापासून सावध राहा'चे फलकही असतात
गेटसमोर अलिशान गाड्या असतात
सारं काही असतं!
पण तिथं जिवाभावाची माणसं कुणीच नसतात!
_____________________________________

'त्या' गल्लीतल्या घरांचे पाडकाम सुरू झाल्याची
बातमी जरी कळली तरी मन हळवे होते
इतके काय गुंतलेले असते की
काळजातही लागलीच एक खोदकाम सुरू होते!

Sunday, 5 February 2023

मीरामार बीचवरचा देखणा म्हातारा


मीरामारच्या बीचवर एक देखणा म्हातारा भेटलेला.
सांजरंगात त्याच्या डोईवरची चांदी तांबूस भासत होती.
सरळ नाक, पाणीदार डोळे, कमानी भुवया, कपाळावर आठ्यांच्या रेषा
गालावर सुरकुत्यांची नक्षी नि शुभ्र दाढी.
अगदी रोमन वाटत होता तो!

म्हातारा ओळखीचा असण्याचा सवालच नव्हता
त्याची नजर समुद्रावर एकटक खिळून होती.
त्याच्यात एक विलक्षण आकर्षण होतं, चुंबकासारखं खेचण्याचं!
खूप वेळ झाला तरी तो तिथेच बसून होता.

Sunday, 22 January 2023

चाफ्याच्या पाकळ्यांची नक्षी



तिचा पती अकाली तिला सोडून गेला त्याला आता बरीच वर्षे लोटलीत
तिची मुले आता मोठी झालीत,
किंबहुना तिने अपार संघर्ष करून ती मोठी केलीत.
मुले स्थिर झालीत, त्यांचे लग्नही झालेय.
दरम्यानच्या काळात ती स्वतःला विसरून जगली, 
तिच्या श्वासावर तिचेच नाव नव्हते.

आताशा तिला रात्री झोप येत नाही.
पतीचे भास होतात.
तिच्या मुलांनी कितीही बजावून सांगितले तरी 
बेडरूमची खिडकी ती उघडी ठेवून झोपते.
अखेरीस मोठ्या कश्मकशनंतर रात्री बऱ्याच उशिरा तिला झोप लागते.
मग तिथं बरंच काही घडत राहतं...

कैक वर्षांपूर्वी तिच्या पतीने अंगणात लावलेल्या चाफ्याचा गंध
तिच्या खोलीत एव्हाना दाखल झालेला असतो,
तो तिच्या भोवती रुंजी घालत राहतो.
काही वेळानंतर खिडकीतून आत आलेला उदास धुरकट चंद्र शांत बसून राहतो,
तिच्या खोलीतल्या मंद लाइट्समध्ये विरघळून जातो.
मग चोर पावलांनी तिथं चांदणं येतं
तिच्या श्रमलेल्या भाळावरून हात फिरवत राहतं.

रोज सकाळी ती आरशात पाहते तेव्हा
तिच्या कपाळावर चाफ्याच्या पाकळ्यांची नक्षी उमटलेली असते..


- समीर गायकवाड 

Friday, 18 November 2022

तुला मरून सहा महिने उलटून गेलेत!....

खरं तर, तुला मरून सहा महिने उलटून गेलेत!
लोकांनी, माध्यमांनी मात्र तुझ्या मृत्यूचा बाजार हिरिरीने मांडलाय
तुझ्या नावाखाली हरेकास आपली पोळी भाजून घ्यायचीय
आपले विचार पुढे रेटायचेत,
असलेले, नसलेले 'इझम' खोल खोल रुजवायचेत
पहार ठोकावी तसे सर्वजण तुझ्या अवशेषांना अगदी खोल मेंदूच्या भुयारात ठोकत आहेत.

तू पुन्हा पुन्हा मिनिटाला हरेक वृत्तवाहिनीवर मरते आहेस
लोकांच्या सोशल मीडियामधल्या पोस्टमध्ये तुझ्या चिंधड्या उडताहेत
काहींनी तर तुझ्या मरणावरही मिम्स बनवलीत
तुझा मृत्यू हा आमच्या विचारधारा पसरवायचा इव्हेन्ट झालाय.

पोरी, तुला खूप दुःख होत असेल ना गं!
'त्याने' तुझे तुकडे केले तेंव्हाही तू इतकी व्यथित झाली नव्हतीस ना!
तुझा बाजार आणखी काही दिवस चालेल,
पुन्हा सारं विसरून सारे नव्या हाडाच्या प्रतिक्षेत राहतील
नवं हाडूक मिळताच तुला अगदी अलगदपणे स्मृतींच्या विजनवासात सोडतील.

तिथे असेल काळाकभिन्न अंधार आणि जीव गुदमरवून टाकणारा एकांत!
मात्र भिऊ नकोस बाळा, तू मोठी धीराची पोर आहेस!
कैक जण तुला नावं ठेवत असतील तरी त्याची पर्वा करू नकोस.

तुला पुन्हा लेकीचा जन्म घ्यावा वाटला तर माझ्या पोटी जन्म घे
तसेही तुझ्यासारख्या शोषितांचे आत्मे माझ्या मस्तकात, हृदयात तेवते आहेत
तेंव्हा पोरी माझ्या पोटी जन्माला ये आणि राहिलेलं आयुष्य मनसोक्त जगून घे!

- समीर गायकवाड

16/11/2022

@shraddha walker murder

Wednesday, 16 November 2022

गावाकडे अजुनी, साधेच एक घर आहे माझे..



गावाकडे अजुनी, साधेच एक घर आहे माझे
तिथेही आता रात्र झाली असेलमात्र अद्यापही तिथला अंधार फितूर झाला नसेल
ओसरीवरच्या गप्पा जारी असतील
पारावरची लगबग मंदावली असेल

खेळत असतील फुफाट्यात पोरं गल्लीबोळातली
माळवदावरती बसुनी असतील आठवणींचे उदास पक्षी
देवळाच्या पायऱ्यांपाशी असतील काही जख्ख वृद्धा
तर काही वाहत असतील सरपणाची, माळव्याची ओझी

स्वयंपाकघरातल्या कालवणांचा गंध पसरला असेल वाऱ्यावर
निजली असेल गोठ्यातली गाय वासराला चाटून झाल्यावर
बारीक आवाजात सुरु असतील गप्पा बायकांच्या
विषय तोच असला तरी जिवंतपणा असेल बोलण्यात त्यांच्या

जीर्ण दगडी वाडे काही झुकले असतील
निष्पर्ण नसूनही झाडे काही वाकली असतील

संथ चालत असतील थकलेली शिसवी माणसं काठी धरून
वाटेने येणाऱ्यास अडवून हालहवाल विचारत असतील, हात फिरवत खांद्यावरून

पानाची चंची उघडली जात असेल
देठ खुडून चुना लावताना जुन्याच गप्पांना रंग चढत असेल
बोलता बोलता विषय निघत असेल
पोटापाण्यासाठी गाव सोडून गेलेल्या पिढीचा कासरा कोण ओढत असेल?

आठवणींनी कासावीस झालेले म्हातारे कुणीएक डोळे पुसत असतील नजर चुकवून
इथे उचक्या लागल्या बरोबर उमगते
याद कोणाची निघते अन् मनातल्या गोठ्यातली गाय रडते हंबरून
गाय रडते हंबरून.

गावाकडे अजुनी, साधेच एक घर आहे माझे
तिथलाच अंधार पहाटेस माझ्या उशाशी येऊन बसतो मायेची साय पांघरून...

- समीर गायकवाड

#sameerbapu #sameer_gaikwad

चार कावळे (चार कौए)

खूप नव्हते, होते फक्त चार कावळे काळे त्यांनी हे निश्चित केलं की उडणारे पक्षी सारे त्यांच्याच ढंगाने उडतील, थांबतील, खातील आणि गातील ते ज्या...