Sunday, 30 November 2025

शहरातील बेघर भिकारी


शहरातील बेघर भिकारी 
रात्री रिकाम्या पोटी 
धुळकट आडोशांना झोपी जातात.
दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात
रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे
म्हणून मनातल्या मनात दुवा मागतात...
भिकारी झोपी गेल्यानंतर तिथं 
चांदणं येतं,
त्यांच्या उशाला बसून कासावीस होतं..
रात्रीस आजकाल आभाळ निव्वळ निरभ्र दिसतं
कारण माझ्या वाट्याचं चांदणं विरतंय
शहरांतला काळोख रात्रभर रस्त्यांवर भटकत असतो
त्याचाही शोध तोच आहे जो माझा आहे...

- समीर गायकवाड

https://www.facebook.com/sameerbapu1/videos/524596562072041

Friday, 28 November 2025

माझ्या फोनमध्ये एक नंबर होता


माझ्या फोनमध्ये एक नंबर होता
ज्याच्यासोबत माझं स्नेहार्द्र नातं होतं
तो नंबर फोनच्या स्क्रीनवर जरी दिसला
तरी माझा दिवस सुखात जायचा
त्या नंबरसोबत माझं नातं यत्र तत्र,
कॉल, टेक्स्ट, व्हॉटस्अप सर्वत्र होतं!

दिवसाच्या प्रारंभापासून मध्यरात्रीपर्यंत
तो नंबर कैकदा क्षेमकुशल विचारायचा,
आज तो नंबर माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नाही
मात्र तो नंबर मी विसरलो नाहीये

Saturday, 11 October 2025

स्वप्नांच्या शेवऱ्या



बहुधा त्यांची ती अखेरची भेट होती, 
खरेतर ते निरोप घ्यायला आले होते बराच वेळ ते एकत्र थांबले, खूप काही बोलले नाहीत
 
ते त्यांच्या आवडत्या नेहमीच्या ठिकाणी, तळ्याकाठी नि:शब्द बसून होते
त्याने आपला हात तिच्या कोमल हातावर ठेवलेला होता
 
त्या स्पर्शातून त्यांची स्पंदने वाहत होती, शेवटी वेळेची मर्यादा सरली
ते दोघेही यंत्रवत उठले, त्यानं तिच्याकडे डोळे भरून पाहिले

Friday, 10 October 2025

सीनामायचं पाणी..

या आठवड्यात गावात अतिवृष्टी झाली
भयंकर पूर आला, शेती बुडाली, गावाची दुर्दशा झाली;
दोन वर्षांपूर्वी म्हाताऱ्या आबाजीच्या पोक्त मुलाने
नापिकीपायी बांधावरच्या लिंबावर फास घेतलेला.

Friday, 26 September 2025

पाण्यात वाहत आलेली स्वप्ने..



लोकहो पाण्यातून जरा लक्षपूर्वक चाला,
पुराच्या पाण्यासोबत गावाकडच्या
निष्पाप जिवांची अधुरी स्वप्नेही वाहत येताहेत,
मदतीच्या आशेने एखादे स्वप्न घट्ट बिलगेल तुमच्या पावलांना.
क्षणभर तरी, त्याला उराशी कवटाळून घ्या,
त्याचं सांत्वन करा, त्याच्याशी बोला
मग, तुमचं काळीज डोळ्यांतून वाहू लागेल!
 
- समीर गायकवाड

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...