Sunday, 14 February 2021

वेडे कबीर..

अस्ताव्यस्त बेफाम वाढलेलं बकाल शहर दिवसेंदिवस प्रेमासाठी आक्रसत चाललंय
युगुले इथे शोधतात जागा, आडोसा, एकांत.
पण कुठे मिळत नाही.
भवताली मात्र असते गर्दी, गर्दी, गर्दी आणि प्रेमाचे गारदी.
युगुले बसतात दिशाहीन प्रवासाच्या रिक्षात
बागेच्या कोपऱ्यात, पडक्या इमारतीच्या भग्न अवशेषात
बंद पडलेल्या कारखान्याच्या दर्पयुक्त परिसरात
अर्धवट बांधकाम झालेल्या सुनसान इमारतीत
अपार्टमेंटच्या चाळीच्या वरच्या मजल्याच्या जिन्यात
शहराबाहेर जाणाऱ्या भकास वाढलेल्या वस्त्यालगतच्या ओसाड भागात
झाडांच्या सांदीत
बकवास चित्रपटाच्या अंधाऱ्या थियेटरात
वर्किंग अवर्स संपलेल्या ऑफिसात
सुटीच्या दिवशी कचेऱ्यांच्या कुंपणात
निर्मनुष्य गल्ल्यात, पडक्या घरात
चादरबदली लॉजच्या गलिच्छ मळक्या खोल्यांत
जिथे कुठे असेल एकांत
तिथे असतात युगुले
मनात हजारो विचारांचे काहूर घेऊन !

Friday, 12 February 2021

चंद्राचं कन्हणं...

रात्र कलताना सज्जात उभी असतेस दुपट्टा ओढून डोक्यावरती
केसात नटमोगरा माळूनी,
भडक लेपांचे आवरण चेहऱ्यावर लेपूनी.
तुझ्या देहाभवती पिंगा घालत रात्र फुलत जाते.
वाढत्या गर्दीच्या साक्षीने.
रात्र सरते, माणसं पांगतात.
त्या रस्त्यावर पसरलेला असतो मोगऱ्याचा मंद दरवळ.
भकास रस्त्यावरून घरी परतताना सोबतीला माझ्या चंद्र असतो.
तो तुझे गहिरे किस्से ऐकवतो
त्यानं कित्येक रात्री तुझ्या दारं खिडक्यात घालवल्यात.
आताशा तुझ्या खोलीच्या कोनाड्यात रोजच्या अंधारात कन्हण्याचा जो आवाज येतो ना
तो त्याचाच आहे...
- समीर गायकवाड

Wednesday, 10 February 2021

काळजाची बाभळ ..


कालच्या पावसाची नाही जमली वेचणी
स्वप्नांची झाली छाटणी

वाहून गेला जुंधळा, कांदा कोवळा
थरारल्या साक्षीच्या कातरवेळा

विस्कटल्या तुरी
पानगळल्या बोरी.

फड सैरभैर ऊसाचा
शिग तरंगला कडब्याचा.

पाखरांची शाळा बांधावर
घरट्याचं मढं झाडावर

मोडल्या माना वृक्षांच्या
विझल्या वाती दिव्यांच्या

आता पुन्हा रिती दावण
छळती तिचे जुनेच व्रण.

गोठ्याच्या छताला
आता टांगतो भविष्याला

तरीही पावसाचे या नुठले वळ
काळजाची झाली बाभळ....

- समीर गायकवाड

Thursday, 10 September 2020

इथल्या आकाशात आता दूरवर निरभ्र दिसत नाही...

आपण दोघांनी अश्मयुगात जन्म घेतला होता
तेंव्हा आपण निसर्गाच्या कुशीत वाढलो, जगलो, मेलो...
जगण्याच्या उर्मीने पुन्हा जन्मलो आपण ताम्रयुगात
तेंव्हा काही संकेत होते जगण्याचे, मरण्याचे.
त्यांचं पालन आपण केलं. बरोबर ना !

श्वासाच्या असोशीने आता आपण पुन्हा जन्मलोय
मात्र या भौतिक सुखसागरात न तू ओळखलंस मला नि मी तुला.
शोधात आपल्याच आपण दोघंही एक काम करतोय
गुगल सर्चमध्ये जात, धर्म, आडनाव, विचारधारा काहीही टाईप करतोय.
उघडया नागडया, क्रूर, बीभत्स, अश्लील वा हिंसक तसबिरी शोधतोय.
खऱ्या खोट्या बातम्यांच्या महापुरात शोधून पहातोय.
खरे तर एकजीवच आहोत आपण तरीही एकेमकां सापडत नाही.
माणूस असण्याचं सत्व जे आपण गमावून बसलॊत.
आता पुन्हा कधी नव्याने कधी जन्म घेतला तर
गाव, शहर, प्रांत, देश, जातधर्म, वर्ण, कुठल्याच सीमा नकोत मला.
सांग काय वाटतंय तुला ?

इथल्या आकाशात आता दूरवर निरभ्र दिसत नाही
तुझ्याही मनात मळभ दाटून आलेय का ?
चालताना रुतणार नाही रस्ता असा उरला नाही
जखमा तुझ्याही पावलांना झाल्यात का ?
जायचे आता कुठे तेही काही केल्या उमगत नाही
गोंधळल्या दिशांचा भास तुलाही झालाय का ?

- समीर गायकवाड

Friday, 15 May 2020

ते ज्या रस्त्यावरून निघून गेले ...


रुळाजवळ तुटून पडलेली ती बत्तीस पावलं 
चालून चालून भेगाळून चिरून गेलेली होती.
त्यांच्या देहावरून रेल्वे गेली तेंव्हा 
ते थकलेले जीव निद्राधीन झालेले…

त्यांचे डोळे तेंव्हा सताड उघडे नव्हते हे एका अर्थाने बरेच होते.
नाहीतर कालच्या रात्री त्यांच्या स्वप्नात आलेलं
त्यांचं चंद्रमौळी घर,
फाटक्या साडीतली बायको,
डोईची चांदी झालेली आई,
दृष्टी अंधुक झालेला जन्मदाता आणि
आपला बाप येण्याच्या खुशीनं अर्धपोटी झोपलेली चिंधूडकी पोरंबाळं,
हे सगळं त्यांच्या डोळ्यात तरळलं असतं.
ते पाहून काहींनी अश्रू पुसले असते तर काहींनी उसासे सोडले असते...

Sunday, 10 May 2020

आईचे सायमाखले हात..

कैकदा खोटं बोललोय आईला.
'मी जेवलोय' असं सांगितल्याशिवाय ती जेवायचीच नाही
मात्र पहिला घास तिच्या ओठावर येण्याआधीच 
ती डोळ्यात रोखून बघायची,
तिथून थेट काळजात उतरायची!
'बापू तू मला फसवू शकत नाहीस' असं म्हणत 
डोक्यावरून हात फिरवत तोच घास भरवायची
माझं जेवण होईपर्यंत समाधानाने पाहत राहायची
मग कुठे, ती जेवायची.

आता अमृताचे घास आहेत पण ती चव नाही,
कारण आता आई देहरुपाने नाही.
मात्र ती वाहते डोळ्यांच्या कडांतून
ती अजूनही तेवते 
देव्हाऱ्यातल्या निरंजनातून..
खिडकीतून येणारा अवखळ वारा 
तिचा गंध घेऊन येतो.
परसातल्या जाईच्या वेलीत ती दरवळते
प्राजक्ताचा सडा होऊन ती अंगणात बरसते
वृंदावनातल्या तुळशींच्या मंजुळेत ती झंकारते
आई नाही अशी कुठली जागा नाही,
ती माझ्या रोमरोमात वसते
रोज रात्री निजताना 
श्वासात माझ्या पाझरते
डोळे मिटताच प्रकटते.
भाळावरुनी हात फिरवते 
तिच्या सायमाखल्या हातांची पुन्हा पुन्हा अनुभूती येते...

- समीर गायकवाड.  







Saturday, 9 May 2020

रुळाजवळ तुटून पडलेली बत्तीस पावलं ...


रुळाजवळ तुटून पडलेली ती बत्तीस पावलं

चालून चालून भेगाळून चिरून गेलेली होती.
त्यांच्या देहावरून रेल्वे गेली तेंव्हा

ते थकलेले जीव निद्राधीन झालेले…


त्यांचे डोळे तेंव्हा सताड उघडे नव्हते हे एका अर्थाने बरेच होते.
नाहीतर कालच्या रात्री त्यांच्या स्वप्नात आलेलं
त्यांचं चंद्रमौळी घर,
फाटक्या साडीतली बायको,
डोईची चांदी झालेली आई,
दृष्टी अंधुक झालेला जन्मदाता आणि
आपला बाप येण्याच्या खुशीनं अर्धपोटी झोपलेली चिंधूडकी पोरंबाळं,
हे सगळं त्यांच्या डोळ्यात तरळलं असतं.
ते पाहून काहींनी अश्रू पुसले असते तर काहींनी उसासे सोडले असते...

Thursday, 8 August 2019

पूर


पाऊस 'काळ्या माती'तही पडलाय आणि 'लाल माती'वरही त्यानं उच्छाद मांडलाय पुराचं पाणी मंदिरातही शिरलंय आणि मास्जिदीतही शिरलंय गावाबाहेरच्या उपेक्षित वस्त्याही पाण्यात बुडाल्यात आणि गावातल्या चिरेबंदी वाड्यांच्या ढेलजाही जलमय झाल्यात. मंदिराच्या कळसाभवती आणि मास्जिदीच्या मीनारांभवती घुमणारे पक्षी कधीच उडून गेलेत. गणेशपेठ, भीमनगर आणि मोमीनगल्लीही पाण्यात बुडून गेलीय. पावसाने भेदाभेद केलेला नाही.... हाहाकारातून वाचण्यासाठी वडाच्या फांद्यांना शेजारच्या पिंपळाचा आधार आहे. एकाच झाडावर असणाऱ्या उध्वस्त घरट्यातले भिन्नवर्गीय पक्षी ओलेत्या पंखांनी शेजारी बसून आहेत. पाऊस उघडला की पुन्हा एकमेकाशेजारी ते आपलं घरटं नव्याने बांधणार आहेत. एव्हढेच नव्हे तर जमिनीच्या हिश्शावरून वाद असलेल्या एकाच बांधावरल्या बोरींनी बाभळींना मदतीचा शब्द दिलाय ! आपण तर प्रगत जीव आहोत चला सर्वांना मदतीचा हात देऊया... - समीर गायकवाड.

Sunday, 28 July 2019

कळीदार ...

वेळ मिळताच मी बागेत चक्कर टाकून येत असतो.
अलीकडेच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली,
आपण दोघं ज्या बाकावर बसायचो, नेमक्या त्याच बाकावर
आता एक तरतरीत जोडपं बसलेलं असतं
ते दुसऱ्या कुठल्याच बाकावर बसत नाहीत.
न राहवून त्यांना आज छेडलंच..
त्यावर ती छानसं लाजली, गालावर तिच्या तेंव्हा मस्त खळी पडली
किंचित अवघडलेला तो गोरामोरा होत उत्तरला,
'या एकाच बाकावर अद्भुत गंध दरवळतो, जो पुन्हा पुन्हा खेचून आणतो !'
मी गालातल्या गालात हसलो.
त्या दोघांचे हात अलगद हातात घेतले
काही क्षणांसाठी हळुवार धरून ठेवले...
तिथून निघताना माझ्याकडे पाहत
बागेतली सगळी झाडं झुडपं पानातल्या पानात नाजूकसं हसत होती आणि
प्रत्येक फुलात आपल्या तरल आठवणी उमलत होत्या...

अजूनही मोगरा तुझ्या कळीदार देहात तसाच घुमतो का गं?

- समीर गायकवाड

Saturday, 22 June 2019

ओढ..


कालच तुझ्या शहरात जोरदार पाऊस पडलाय.
मेघांना विचारलंस का, की ते कुठून आले होते ?
पावसात चिंब भिजतानाची 
तुझी तस्वीर घेऊन मेघ सकाळीच परतलेत
आज रात्रीला पुन्हा 
तुझ्याच शहरात बरसायचंय म्हणत होते ते.
तुझी ओढ लागली की हे असं होत असतं !
मेघांची घालमेल मी नक्कीच समजू शकतो. 
होय ना गं ?

- समीर गायकवाड.
        

Thursday, 13 June 2019

फुलपाखरु


वाळूतले ठसे तुझे, केंव्हाच मिटून गेले
पण देहाचा गंध अजुनी दरवळतो किनाऱ्यावर
त्या गंधवेडापायी तर, समुद्रास भरती येत नसेल ना ?

तुला भेटलो त्या वळणावरचे चिरे भग्न झाले
पण स्पर्श तुझा अजुनी झिळमिळतो पत्थरांवर
त्या स्पर्शप्रेमापायी तर, पाऊस कोसळत नसेल ना ?

तू जाताच तुझ्या घरातले चैतन्य निघून गेले
पण आठवणींचा मोगरा अजुनी फुलतो वेलीवर
त्या स्मृतीगंधापायी तर, वाऱ्याला गहिवरत नसेल ना ?

अनिमिष चराचर दिक्कालासह गोठून गेले
पण फुलपाखरं भिरभिरतात अजुनी सुकलेल्या फुलांवर
त्या विरहखुणापायी पंखावर त्यांच्या, नक्षी उमटत नसेल ना ?

- समीर गायकवाड.

https://kavitasameeer.blogspot.com/2019/06/blog-post_13.html

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...