Wednesday, 24 April 2019

वीजेस आलिंगन..


पाऊस दिवसागणिक आक्रसत जाताच

साकळते आभाळ झाडांच्या देहात


संध्येस क्षितिजाच्या तळाशी  

दाटती कळप लाल तांबड्या हत्तींचे


डोहात पाण्याच्या म्लान  

विरघळे प्रतिबिंब थकल्या पक्षांचे


थरथरती गायी गोठ्यात

डोळ्यात साठवित शुष्कचंद्र


शेताची पायवाट नजरेत तरळता

होतसे कोलाहल मनात रित्या मेघांचा


धूळ कर्दमले पाय घेऊनि

अंथरतो बिछाना छतावर, देण्या वीजेस आलिंगन .....

जमाव


पाच भिकारी जमावाने जिवंत ठेचून मारले,
आम्ही निर्विकारपणे त्याचे व्हीडीओ पाहिले,
चोरी, अपहरण, छेडाछेडी, धर्मभेद, वर्चस्ववाद, गोहत्या, गोवंश मांस 
कसलाही संशय जमावास पुरेसा असतो.
वर्तमानपत्रीय भाषेनुसार गत काही दिवसांत 
हिंस्त्र जमावाने प्रक्षुब्ध होत अनेकांना नेमके 'वेचून' हालहाल करून ठार केले.

बहर

काळोख कापून आलोय तुझ्या दारी, हवे तर मला नकोस बिलगू 
काळजाताला माझ्या काढून घे चंद्र, उजळून उठेल तुझी हवेली 
गीत तुझ्या प्रकाशाचे लिहिण्यासाठी, गहाण टाकलीत बोटे कनवाळू 
तोरण दुसऱ्याचे बांध खुशाल, दुनिया कधीच मला विसरून गेली.
रडला निशिगंध जरी कर्दमल्या रात्रीस, नकोस त्याला चुरगाळू
सांग चुका माझ्या त्याला, स्वप्ने निरागस भुलून खंजिरास गेली
आली चुकून आठवण कधी माझी, तर नकोस छद्म अश्रुंचे ढाळू
प्राजक्तातच बहरतो मी, म्लानफुले त्याची चिरडून फुलत तू गेली....

- समीर गायकवाड 

पाऊस ..


पाऊस पडता गर्जून,

अंग जाई भिजून,
रस्ते निघती धुवून,
गवत येई खुलून,
वेली जाती फुलून l

पाऊस पडता गर्जून,

पक्षी उडती सरारून,
आभाळ जाई भरून,
शाळा वाहे भरून,
दप्तर जाई भिजून l

दांभिक..

झाडे एकमेकांना खेटून वाढतात,
माती लाल असली काळी असली तरी जगतात ,
झाडे एकमेकांना त्रास देत नाहीत
परस्परांच्या फांद्यावरती माथा टेकवत आनंदानं राहतात.
कोणताही पक्षी कुठल्याही झाडावर घरटी बांधतो,
झाडे त्यांना अडवत नाहीत
त्यांचे जातपंथ, नावगाव कुळ गोत्र विचारत नाहीत.
वेणुनाद हिरव्या पिवळ्या पानात भेद करत नाही,
पाने कुठलीही असो वारा त्यांना गोंजारूनच जातो.
सूर्यप्रकाश सगळीकडे तोच दिसतो
त्याची आभा, त्याचे तेज, त्याची झळाळी तशीच जाणवते.
अंधाराच्या डोहात उतरलेलं चांदणंही सगळीकडे सारखंच असतं,
ना काळोख वेगळा असतो, ना रात्रकळा वेगळ्या असतात.
जमीन असो वा समुद्र डोक्यावरचं आभाळ सर्वत्र निळंच असतं.
माणूस कोणताही असो त्याचे अश्रू खारटच असतात नि सर्वांचे रक्तही लालच असते.

सिंह अजूनही गवत खात नाही की हरीण मांस खात नाही. 
विश्वातले सर्व गुणधर्म जसेच्या तसे टिकून आहेत अपवाद फक्त माणसाचा आहे,
भेदाचा विखार त्याच्या नसानसात खोलवर भिनला आहे,
तरीसुद्धा माणूस स्वतःला पृथ्वीवरचा सर्वात विचारी आणि विवेकी जीव म्हणवून घेतो !
हीच खरी दांभिकता आहे ..
हीच खरी दांभिकता आहे...

- समीर गायकवाड 

अखेरची भेट...


भौरम्माने समुद्र पाहिलेला नव्हता,
समुद्र पाहण्याची तिची अनिवार इच्छा होती.
ती मरण पावल्यावर
गावातल्या लोकांनी तिची रक्षा समुद्रात अर्पण केली....
भौरम्माच्या रक्षा कलशातून विलापध्वनी येत होते,
जणू ती हमसून हमसून रडत होती.
मरणाआधी कित्येक महिने
ती अंथरुणाला खिळून होती,
अखेरचे काही दिवस तर ती बेशुद्ध होती.
गावाने तिची अपार सेवा केली.
तिचे मोठे सरण रचले,
अख्खं गाव लोटलं होतं तिच्या दहनाला
शेजारच्या विश्वनाथनने अग्नी दिला होता.

रिजेक्ट..


द्रौपदीची थाळी..

'ते' कुठेही दिसतात.
डांबरी रस्त्याचे उध्वस्त कोपरे,
अवाढव्य पुलांखालचे काळोखे कोनाडे
गर्दीने सुजलली रेल्वे स्टेशन्स, बस स्थानकं,
सिव्हील हॉस्पिटल, तत्सम सार्वजनिक ठिकाणं
अस्ताव्यस्त रहदारीने व्यापलेले सिग्नल्स.

'ते' कळकटून गेलेले.
अजागळ अस्वच्छ किळसवाणे.
केसाच्या जटा, अंगावर धुळीची पुटे,
काळवंडलेल्या कपड्यांची लक्तरे
भेगाळलेले ओठ, हातापायाची वाढलेली नखे

पायाचे चिरलेले तळवे आणि
धूळधुरातही चालणारे फुफ्फुसांचे भाते
चिल्बटलेले केस अन् घामेजलेलं अंग
कधी मळकटलेली पथारी पसरलेली
तर कुठं चवाळं अंथरलेलं.

शेजारी ठेवलेलं, करकचून आवळलेलं कसलं तरी गाठोडं
जवळच क्वचित काळपटलेली चेमटलेली ताटवाटी.

आसमंतात विरघळणारा गर्दीचा गोंगाट, वाहनांचा कर्कश्श आवाज
'त्यांच्या' कानावरून रेंगून सरपटत एकजीव झालेला.

'त्यांचे' चेहरे एकसारखेच, त्यांची देहबोलीही एकसारखीच.

'ते' सदैव हात पुढे करत नाहीत
पण त्यांच्या डोळ्यातून भुकेचा लाव्हा पाझरतो.

काळजात कणव दाटून येताच मी जवळ जातो,
काहीतरी द्यावे म्हणून खिसे चाचपतो.
तेवढ्यात लक्षात येतं की,
भोवतालच्या सभ्य बघ्यांची अस्वस्थ पांढरपेशी नजर
माझ्यावर आणि 'त्यांच्या'वर रोखलीय
मग खूप अवघडल्यासारखं वाटतं

मी 'त्यांच्या'कडे पाहतोय,
संथगतीत जवळ येतोय हे लक्षात येताच
'त्यांच्या' ओलेत्या बुब्बुळात चमक दिसते.

'त्यांच्या' दर्पाने शिसारी येते, उबळ दाबत तिथं काही क्षण जातात
दरम्यान लोकांच्या नजरेतला तिरस्कार अंगावर येतो,
घृणेच्या नजरा अंगावरून सरपटत जातात

'त्यांच्या' आणखी जवळ जाऊन त्यांची दुःखे विचारावीशी वाटतात
असं खितपत जगण्यामागची कारणे जाणून घ्यावीशी वाटतात
'त्यांच्या' खांद्यावर हात ठेवावासा वाटतो,
विनातक्रार ऊन वारे पाऊस झेलणाऱ्या
त्या निराधारांच्या घुसमटलेल्या जगात शिरावेसे वाटते.

'त्यांचा' भूतकाळ कसा असेल याची आर्त उत्कंठा
काळजात दफन करून मी माघारी फिरतो
तिथून मागे फिरताच लोकांच्या नजरा देखील लक्ष्य बदलतात

'त्यांना' अजून काहीतरी द्यायला हवं होतं असं सारखं वाटत राहतं!
'त्यांची' आत गेलेली पोटं,
तळहातावरच्या जीर्ण झालेल्या भाग्यरेखा आणि
डोळ्यातून ओघळणारी याचना माझ्याभोवती फेर धरून नाचत राहतात.

अपराधाची टोचणी कधी डोळ्यांस तर कधी काळजास लावत
'त्यांना' डोळ्याआड करत आपल्या खुशहाल जगात मी आस्ते कदम परततो.

'द्रौपदीच्या थाळी'चा पत्ता लिहून 'त्यांच्या' वतीने पत्र पाठवतो
सव्वाशे कोटी देशबंधूंच्या घरी पोस्टमन पत्र घेऊन जातो
कासावीस झालेलं पत्र 'चुकीचा पत्ता' म्हणत रोजच रिजेक्ट होऊन परत येतं.....

- समीर गायकवाड

प्रतिक्षा



कधी आलीस घरी परतुनी जरी, दारात मी उभा असेन नसेन....
प्रतिक्षेचे सुकलेले ताटवे झुलतील, अंगणात तुझ्या स्वागतासाठी.
दारावरचे तोरण सांगेल, झुरलो किती युगे मी तुझ्या दर्शनासाठी.
मंजुळांच्या देहातले गीत थिजलेले ऐक जरा, वृंदावनाच्या भल्यासाठी.
धुळकटलेल्या घराच्या खिडक्यातले उसासे, उदास हसतील तुझ्यासाठी.
मलूल रातराणीचा गंध फिका, देईल जबानी माझ्या बेचैन संथरात्रींची !
कोनाडयातली कालबाह्य सतार, वाजवेल धून माझ्या विरहायुष्याची.
नागमोडी जिन्यावरच्या पाऊलखुणा, वदतील गाथा तुझ्या शोधाची.
नक्षीदार हृदयाचा कशिदा दिसेल, भिंतीवर तिथेच माझ्या तसबिरीशेजारी !
हलकेच फिरव कोमल कर, अभ्र्यात उशीच्या दफन केलेल्या अश्रुंवरी.
बिछान्यात नकोस झोपू, येतील भयाण स्वप्ने प्रतिक्षार्त भग्न प्रासादांची.
छताकडे नकोस पाहू, न जाणो उमटले असेल बिंब सताड उघड्या डोळ्यांचे.
झुंबरातल्या दिव्यांना विचार, अंधारकळांचे अस्तित्व होते किती काळाचे.
अर्धमिटलेल्या पुस्तकांच्या पानात भेटतील, ठसे थरथरत्या बोटांचे.
थबकू नकोस कुठेही, सरळ आत ये.. घरात ह्या मी असेन नसेन....
देव्हारा देईल साक्ष, समईत अल्वार विझलेल्या स्वप्नांच्या वातींची.
भिंतीत चिणलेले अबोल श्वास सांगतील गाथा माझ्या प्रेमवेदनेची.
मात्र रेलू नकोस सज्जात, पडुनी इथूनच संपवली मी यात्रा आर्त प्रतिक्षेची ....

- समीर गायकवाड

चक्रव्यूह..

कवितेनं उभं केलेलं हे प्रश्नचिन्ह अजूनही कपाळावर वागवतो मी.
कधी अस्वस्थ वाटलं तर आवर्जून तिला पाहतो, ऐकतो.
"आपण काहीच करू शकत नाही का ?"
हा प्रश्न पुन्हा पुन्हा
मस्तकावर घणांचे घाव घालू लागतो तेंव्हा 
सत्याचे नेमके सत्व शोधू पाहतो.


चक्रव्यूह रोजच्या घटनांचा आहे, भवतालाचा आहे, समाजाचा आहे
आणि देशाचाही आहे,
यात अडकण्याची इच्छा ज्या दिवशी दुबळी होते
तेंव्हा पुन्हा पुन्हा कवितेची शाई रक्तात उतरवतो.
शिथिल झालेल्या धमन्यातलं रक्त पेटवतो.
तरीही प्रश्न पडतो -
"माझ्यानंतरही चक्रव्यूह राहणार आहे, तर मी का लढू ?"

मग या प्रश्नाच्या चिरफाळया उडवत सत्वाने जगण्याचे इरादे बुलंद करतो.
आपल्यातलं पुरुषत्व म्हणजे तरी काय याचा शोध घेतो.

यशोदेचा कान्हा


आटला जरी मायेचा पान्हा, उदास न होई कान्हा  
देवकीचा खट्याळ तान्हा, जाई गोठ्यात पुन्हा
बिलगता गाईच्या कासा, पाहुनी चित्तचोरट्या    
लाडे म्हणतसे यशोदा, कान्हा तू असा रे कसा ?
सांग नंदाच्या सुता, माझा आटला का रे पान्हा?
कान्हा म्हणे यशोदेस, काय सांगू आता बहाणा

"माझ्या सगळ्याच ह्या माता, मला बघुनी फुटे त्यांनाच पान्हा ! !"

ऐकूनी त्याचे मधाळ बोल यशोदा म्हणे, 'माझा लाडाचा गं कान्हा !'

- समीर गायकवाड.

चैत्रातला वैशाख .....



पार्थिवाजवळच्या शोकमग्न आप्तेष्टांसारखी
झाडे निश्चल उभी असतात तेव्हा
जणू आईच्या कुशीत तोंड खुपसण्यासाठी
सकल मेघ निघून गेलेले असतात.
निरभ्र झालेले आकाश एकटेच उरते,
मुलाच्या अकाली मृत्यूनंतर थिजलेल्या बापासारखे !
एरव्ही उन्मुक्त वाहणारा वारा क्षितिजपार
तोंड लपवून उभा असतो,
निष्पाप अनाथ मुलासारखा.
श्रद्धांजली वाहताना निशब्द झाल्यागत
गळपटलेली तमाम पानेफुले स्तब्ध असतात.

एरव्ही उनाडक्या करत फिरणारे पक्षी
पंखाचे ओझे झाल्यामुळे की काय,
मोडकळीस आलेल्या घरटयांत,
वाळक्या फांद्यात अचल असतात.
पाणी आटत आलेले शुष्कओले तळे,
बगळयांच्या विरहाश्रूंच्या शोधात खोल खोल जात राहते.
गरम फुफुटयाने भरलेला धगधगता अनवाणी रस्ता,
वाटसरूंच्या शोधात ऊनसावलीच्या बेटातून
नागमोडी वळणे घेत धावत असतो.
विहिरीच्या तळाशी कोरडया होत चाललेल्या
जडशीळ गाळाला
वळवाच्या मृगजळांचा स्फटिकाभास होत राहतो.
उन्हाने भोवळ येऊन पडलेल्या मयूरपंखी फुलपाखरांभोवती,
मुंग्यांची शिस्तबद्ध शोकसभा भरते.
सुकलेल्या फळांच्या नीरस टणक सालींना
पोखरून टोकरून मुंगळे हताश झालेले असतात.

भेगाळलेल्या देहानं उन्हे झेलणारी माती
चोळामोळा होऊन गेलेली असते,
वार पडलेल्या म्लान गायीसारखी !
देहाची काहिली करणाऱ्या उन्हात सगळा आसमंत,
अंतर्बाह्य घुसमटून निघत असतो ज्वालामुखीच्या लाव्ह्यासारखा.

सकाळीच सुरु होणाऱ्या घामाच्या धारा मेंदूत झिरपत जातात,
चैत्रात आलेला वैशाख वणवा असाच जाळत राहतो!

- समीर गायकवाड.

लेखणीच्या लक्ष जिभांनी

रोजच्या सवयीने इकडे साहित्यिकांनी  आभाळ विकायला काढले  तिकडे आंदोलनकर्त्यांनी रक्त मांसाच्या समिधा केल्या रोज त्याच त्या गमजा बघून वैतागलेल्...