Wednesday, 24 April 2019

वसुंधरेच्या कविता...



वसुंधरेने आकाशाच्या पानावर लिहिलेल्या कविता म्हणजे वृक्ष !
आम्ही ते तोडून त्याच्यापासून कागद बनवतो त्यावर पोकळ शब्दांचा आलेख मांडतो
आणि त्याला साहित्य म्हणतो !
वसुंधरेच्या कवितेशी कधीही बरोबरी करू न शकणारे साहित्य !
आमची गीतेही खोटीच असतात.
खरी गीते आपल्या आसपासच असतात, जी सृष्टीने रचलेली असतात.

जसे की,
आईच्या हृदयातील शांततेत निद्रिस्त झालेलं गीत तिच्या छातीशी बिलगलेल्या बाळाच्या ओठांवर खेळतं !
पाऊस थेंबांनी आपला देहदाह विझल्याचं गीत माती गाते,
तिची भाषा असते मृदगंधाची !

मरणासन्न झालेला जीर्ण वटवृक्ष कोसळण्यासाठी तिष्टत असतो
अन चकाकणारी सौदामिनी त्याच्यावर झेपावते,
वटवृक्षाचा कोळसा होतो पण मरतानाही तो गीत गातो.
त्याची भाषा असते मिठीची !

वसुंधरा जेंव्हा रुसते तेंव्हा
तिला रिझवण्यासाठी पिसाळलेले ढगही आत्ममग्न होऊन दोषानुभूतीने काळे ठिक्कर पडतात.
वसुंधरेनेच लिहिलेल्या कवितेला आर्त शब्दात गाऊ लागतात,
वृक्षांपाशी आपला निरोप देतात अन एके दिवशी संततधार बरसून तिला चिंब भिजवतात.
ते गीत असते मिलनाचे !

अप्सरेच्या तलम केसांत माळलेल्या गजऱ्यातली दुर्मुखली फुले मुकीच राहती
झाडांवरून गळून पडणारी कोमेजली फुले आनंदे गिरक्या घेत गीत गाती,
त्यात असते तत्व जगण्याचे, हसऱ्या कळीच्या जन्मापासून ते सुखद मृत्यूचे !

असलं काही आपण रचू शकू,
तेंव्हा आपल्या शब्दांना कविता म्हणता येईल,
गीत म्हणता येईल,
साहित्य म्हणता येईल.
तोवर आपला केवळ पोकळ शब्दखेळच चालू आहे असं म्हणायचे......

- समीर गायकवाड.

खलिल जिब्रानच्या कवितेवरून सुचलेलं..

सावली..

तिला मी शेवटचे कधी भेटलोय 
नेमके आठवत नाही
पण ती सांज खूपच मोठी होती, 

सरता सरली नाही.

काळजाचे डोळे करून 

वाट पाहणारं कुणी असेल का,
की आताही सांज झालीय 

म्हणून काय घरीच जायचं का ?

पूर्वी सांज होताच 

पाखरांचा चिवचिवाट असायचा
आता सूर्यास्त होता 

जीवाची पिसे छिलून निघतात
घरी जाताच 

डोळ्यातला संधीकाळ आरशात उतरतो.
एक सावली नकळत पाठीवर हात ठेवून जाते, 

मी तृप्त शहारतो !

- समीर गायकवाड 

~~~~~~~~~~~~~

ही कविता माझ्या आईसाठी लिहिलीय...

पुस्तकांचा अर्थ ....


पुस्तकांचा अर्थ.. 

 

तिच्या चेहऱ्याचं पुस्तक मन लावून वाचलं
तरीही प्रेमात उत्तीर्ण झालो नाही
दरम्यान पाठ्यक्रमाची क्रमिक पुस्तकेही कशीबशी चाळत गेलो,
खूपच रटाळ होती ती.
निकालात जेमतेम काठावर तगलो!
तरीही आयुष्याचा पट मात्र मखमली झालाय.

सोबतीला सहाध्यायी असणारे काही खूप हुशार होते
मन लावून अभ्यास केला त्यांनी,
मास्तर म्हणायचे,

'बघ, असं पुस्तकी किड्यासारखं पानापानात शिरावं लागतं मग कुठं यश मिळतं!"
सर्व कसोट्यावर त्यांनी अफाट गुण मिळवले
त्यांच्या आयुष्याचा पट तर आता सोनेरी झालाय.

मात्र एक फरक झालाय
वयाची चाळीशी उलटल्यावरही त्यातले काही प्रेमाच्या शोधात आहेत,
काही आयुष्याचा अर्थ धुंडाळताहेत
त्यांचा तो सुवर्णपट आतून काटेरी असल्याचा शोध कालच लागलाय...
बरं झालं, तिच्या चेहऱ्यावरचं पुस्तक मी पूर्वीच वाचलंय.
आता केवळ मध्यात आलोय पण तृप्तता शिगोशिग भरलीय!

दोस्तहो, पुस्तकं वाचलीच पाहिजेत

पुस्तकं जीवन समृद्ध करतात, नवा आयाम देतात

आयुष्य घडवतात;
त्यांच्या जोडीने जिती जागती माणसंही वाचता यायला हवीत
पुस्तकांचा अर्थ मग अधिक खोलवर उलगडत जातो!


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Tuesday, 16 April 2019

प्रेम


मी अंगण होतो तू प्राजक्त हो, तू तुळस हो मी वृंदावन होतो
राखण घराची करताना गवाक्षातुन, घनश्याम बघ कसा डोकावतो!
मी माती होतो तू आभाळ हो, तू पाऊस हो मी वीज होतो,
पिऊनी मृदगंध फिरताना, परसात धुंदवारा बघ कसा गुणगुणतो !
मी बीज होतो तू अंकुर हो, तू तहान हो मी पाणी होतो,
मातीतून उगवलेलं स्वप्न हिरवं पाहताना, विधाता बघ कसा हरपतो !
मी वृक्ष होतो तू सावली हो, तू बासरी हो मी स्वर होतो
साजसंगीत आपल्या सुरांना चढवताना, निसर्ग बघ कसा डोलावतो  !
मी चांदणं होतो तू उजेड हो, तू वात हो मी ज्योती होतो.
अक्षरगाणं संसाराचं ऐकताना, तल्लीन होऊनि विठू बघ कसा हसतो !
मी कपाळ होतो तू गंध हो, तू तबक हो मी निरंजन होतो
चिरंतन आपुल्या अगाध प्रेमाचं, निहंता बघ कसं औक्षण करतो !
मी प्रयत्न होतो तू कर्तृत्व हो, तू नियती हो मी प्रारब्ध होतो 
जगणं जरी असलं कळसूत्री तरी, प्रेम मात्र आपण खरंखुरं करतो !   

- समीर गायकवाड.

Tuesday, 9 April 2019

पानातलं मन


बैलं चालती जोडीनं, रान हासतं पानात 
वेली डुलती वारयावरी, पानं वाजवती शीळ 
वारा शिरतो पिकात, पीक हालतं वेगानं 
माती घुमते शिवारात, गाय हंबरे रानात 
मेघ उतरे डोंगरात, काळीज डोंगराचं होई 
डोळे वाहती भरून, पाऊस उतरतो रानात 
रान फुलते तरारून, फुलं उमलती देहात 
बैल चालती जोडीनं, पानं हासती मनात !

- समीर गायकवाड.

Tuesday, 26 March 2019

घरंगळलं आभाळ


घरंगळलं आभाळं तुझ्या कोयरी डोळ्यांत
मनं खिल्लारं धावून गेलं चौखूर दिशांत
गोंदण दंडाचं दिसतां उडती कारंजी काळजात
हसली पाखरं खुदकन जुंधळ्याच्या ऐन्यात
हळदल्या पावलांनी माती जाई हरखून
भर उन्हातलं लागिरं पारंब्याच्या सावल्यात
रान झपाटलं तुझ्या चंदनगंधी देहात
गाभुळलं उन्हं तलम कायेला शिवून
उधाणल्या अंगातला घुमं पारवा जोरात
गेली लाजून झाडं वेली गेल्या झिम्माडून
गाणं प्रेमाचं गातंया उभं शिवारं नाचत...

आठवणींच्या पाकळ्या

कालच ती भेटली.
तेंव्हा तिला सांगितलं,
तुझ्या बंदिस्त घराभोवती चौदिशेने कुंपण बांधताना
किमान त्यास तरी एक दरवाजा ठेव
एखाद्या दिवशी तुला
जगाची गरज नक्कीच भासेल.....

माझ्या मात्र दशदिशांनाही कुठेच दरवाजे नाहीत
की खिडक्या नाहीत.
जीव गुदमरवणारी सर्वव्यापी रेंगाळणारी निर्वात पोकळी फक्त आहे.
माझ्यासाठी कुणी दारं उघडी ठेवली असती
तर मी इथे असलो नसतो.

कबरीवरून काल माझ्या ती हळुवार हात फिरवून गेली तेंव्हा
तिच्या मिटलेल्या डोळ्यात अश्रू होते
काही हुंदके आणि कढ ठेवून ती गेली.
आता माझ्या भवताली आठवणींच्या सदाबहार पाकळ्या भिरभिरताहेत....

- समीर गायकवाड

Saturday, 23 March 2019

जाताना सांगून तो गेला होता...


जाताना सांगून तो गेला होता, "आता लवकरच मी परतेन घरी
वचन तुला दिलेलं अधूरं राहिलं तरी भारतमातेचं वचन मात्र पुरं करेन" 

वचन मला दिलेलंही त्याने पुरं केलंय, तो खरेच लवकर घरी आलाय
पूर्वी गणवेशात घरी यायचा, यावेळी तिरंग्यात लपेटून आलाय.

त्याचं मुखकमल पाहून हरखलेली माय म्हणतेय, हिरा माझा कसा निजलाय
त्याला छातीशी आपल्या गच्च धरून वृद्ध पित्याने मात्र हंबरडाच फोडलाय 

जिचा तो सौभाग्य अलंकार होता तिचा साजशृंगार कधीच गळून पडलाय
तिच्या स्वप्नांचा आणि आयुष्याचा हा एकच ध्रुवतारा होता जो निखळलाय

कसे सांगू मी तुम्हाला, "की सरहद्दीहून कुणाची माती आली आहे ?
हा अन्य कुणी नाही, हा तर माझ्या काळजाचा तुकडा, हा मोठा बंधू आहे ! "...

हा तुकडा काळजाचा असा अवचित कसा गळून झडलाय

सहवेदनेसाठी जमलेला भावूक जत्था अल्पजीवी आहे, उद्याचा सवाल पडलाय..     

Tuesday, 5 March 2019

मैत्र


धगधगत्या निखारयावरून चालताना स्वतःला जाळून
दुसरयासाठी त्या विस्तवाचं चांदणं करतात,
आपल्या स्वप्नांची राखरांगोळी करून दुसरयांची सुखे सजवतात,
आपली अडचण लपवून सदैव मदतीचा हात पुढे करतात,
आपल्या वाट्याचं आभाळ दुसरयाच्या अंगणात रितं करतात,
ते मित्र असतात.....

Tuesday, 26 February 2019

दरवळ


तुझ्या ऑफिसच्या रस्त्यावरचीच गोष्ट आहे,
काल पाऊस पडत असताना ज्या झाडाखाली उभी होतीस
त्या झाडाची तमाम हिरवी पिवळी पानं बेहोष झालीत..

आताच मी ऐकलंय, ते झाड डोळे मिटून पावसासाठी दुवा करत होतं !
________________________________________________

जुन्या घराजवळ तुझ्या, काल गेलो होतो
अंगणातल्या पारिजातकाच्या फुलांत अजूनही तुझ्या अश्रूंचा दरवळ होता.
परतून आलीस कधी तर पानांना विचार
श्वासात माझ्याही गंध तुझाच भरलेला होता!

कावरा बावरा होत, तिथंच घुटमळत होतो
सागवानी बंद दारातही तुझ्या दिसण्याचा तोच जीवघेणा भास होता.
समजून घेतलंस कधी तर श्वासांना विचार, 
काळजात तुझ्याही परिमळ माझाच होता !

___________________________________________________



अलीकडे हे असेच होते, त्वरित रिप्लाय द्यायचे ठरवतो 

आणि नकळत अंगणातल्या पारिजातकात गुंतून पडतो...
फुलांचं बहरणं चालूच राहतं, 
त्या नादात शब्द विसरून जातात...
बघता बघता रिप्लायला उशीर होतो...
पाकळ्यांवरचे दवबिंदू डोळ्यात दाटले की भानावर येतो 
पाहतो तर शाईत फुलांचा गंध दरवळत असतो !!!...

_______________________________________________

खिडकीतून गरम हवा आली तेंव्हाच ओळखले मी
पडद्याआड तुझेच ऊर धपापले असणार !
उंबरठयावरची रांगोळी सांगून गेली मजला,
येण्याची माझ्या, प्रतिक्षा अनंत झाली असणार !

मी असाच आलो अवचित वारा जसा पदराशी खेळाया
तू होती भिनवित आठवणी ऐन्यात हळदीच्या राया
येताच घरात मी, शहारल्या माळावरच्या मुग्ध आमराया !
चल पसरू दे दरवळ, वारा गंधवेडा आसुसला असणार !


- समीर गायकवाड 

Wednesday, 6 February 2019

सावल्यांचा गंध


क्षितिजाच्या खोल डोहात आता काही वेळात हा केशरी सूर्य बुडून जाईल

माझ्या दिवाणखान्यातल्या तिच्या सावल्या ज्याने सोबत नेल्यात.

आता या अंधाररात्रीस अंगभर चांदणं ल्यालेला चंद्रमा खिडकीत येऊन बसेल

ज्याला वेड लागलेय तिच्या सावल्यांच्या गंधाचे, त्याला आता काय सांगावे?

- समीर गायकवाड 

लेखणीच्या लक्ष जिभांनी

रोजच्या सवयीने इकडे साहित्यिकांनी  आभाळ विकायला काढले  तिकडे आंदोलनकर्त्यांनी रक्त मांसाच्या समिधा केल्या रोज त्याच त्या गमजा बघून वैतागलेल्...