Wednesday, 24 April 2019

चक्रव्यूह..

कवितेनं उभं केलेलं हे प्रश्नचिन्ह अजूनही कपाळावर वागवतो मी.
कधी अस्वस्थ वाटलं तर आवर्जून तिला पाहतो, ऐकतो.
"आपण काहीच करू शकत नाही का ?"
हा प्रश्न पुन्हा पुन्हा
मस्तकावर घणांचे घाव घालू लागतो तेंव्हा 
सत्याचे नेमके सत्व शोधू पाहतो.


चक्रव्यूह रोजच्या घटनांचा आहे, भवतालाचा आहे, समाजाचा आहे
आणि देशाचाही आहे,
यात अडकण्याची इच्छा ज्या दिवशी दुबळी होते
तेंव्हा पुन्हा पुन्हा कवितेची शाई रक्तात उतरवतो.
शिथिल झालेल्या धमन्यातलं रक्त पेटवतो.
तरीही प्रश्न पडतो -
"माझ्यानंतरही चक्रव्यूह राहणार आहे, तर मी का लढू ?"

मग या प्रश्नाच्या चिरफाळया उडवत सत्वाने जगण्याचे इरादे बुलंद करतो.
आपल्यातलं पुरुषत्व म्हणजे तरी काय याचा शोध घेतो.

यशोदेचा कान्हा


आटला जरी मायेचा पान्हा, उदास न होई कान्हा  
देवकीचा खट्याळ तान्हा, जाई गोठ्यात पुन्हा
बिलगता गाईच्या कासा, पाहुनी चित्तचोरट्या    
लाडे म्हणतसे यशोदा, कान्हा तू असा रे कसा ?
सांग नंदाच्या सुता, माझा आटला का रे पान्हा?
कान्हा म्हणे यशोदेस, काय सांगू आता बहाणा

"माझ्या सगळ्याच ह्या माता, मला बघुनी फुटे त्यांनाच पान्हा ! !"

ऐकूनी त्याचे मधाळ बोल यशोदा म्हणे, 'माझा लाडाचा गं कान्हा !'

- समीर गायकवाड.

चैत्रातला वैशाख .....



पार्थिवाजवळच्या शोकमग्न आप्तेष्टांसारखी
झाडे निश्चल उभी असतात तेव्हा
जणू आईच्या कुशीत तोंड खुपसण्यासाठी
सकल मेघ निघून गेलेले असतात.
निरभ्र झालेले आकाश एकटेच उरते,
मुलाच्या अकाली मृत्यूनंतर थिजलेल्या बापासारखे !
एरव्ही उन्मुक्त वाहणारा वारा क्षितिजपार
तोंड लपवून उभा असतो,
निष्पाप अनाथ मुलासारखा.
श्रद्धांजली वाहताना निशब्द झाल्यागत
गळपटलेली तमाम पानेफुले स्तब्ध असतात.

एरव्ही उनाडक्या करत फिरणारे पक्षी
पंखाचे ओझे झाल्यामुळे की काय,
मोडकळीस आलेल्या घरटयांत,
वाळक्या फांद्यात अचल असतात.
पाणी आटत आलेले शुष्कओले तळे,
बगळयांच्या विरहाश्रूंच्या शोधात खोल खोल जात राहते.
गरम फुफुटयाने भरलेला धगधगता अनवाणी रस्ता,
वाटसरूंच्या शोधात ऊनसावलीच्या बेटातून
नागमोडी वळणे घेत धावत असतो.
विहिरीच्या तळाशी कोरडया होत चाललेल्या
जडशीळ गाळाला
वळवाच्या मृगजळांचा स्फटिकाभास होत राहतो.
उन्हाने भोवळ येऊन पडलेल्या मयूरपंखी फुलपाखरांभोवती,
मुंग्यांची शिस्तबद्ध शोकसभा भरते.
सुकलेल्या फळांच्या नीरस टणक सालींना
पोखरून टोकरून मुंगळे हताश झालेले असतात.

भेगाळलेल्या देहानं उन्हे झेलणारी माती
चोळामोळा होऊन गेलेली असते,
वार पडलेल्या म्लान गायीसारखी !
देहाची काहिली करणाऱ्या उन्हात सगळा आसमंत,
अंतर्बाह्य घुसमटून निघत असतो ज्वालामुखीच्या लाव्ह्यासारखा.

सकाळीच सुरु होणाऱ्या घामाच्या धारा मेंदूत झिरपत जातात,
चैत्रात आलेला वैशाख वणवा असाच जाळत राहतो!

- समीर गायकवाड.

मरणोत्सुक...


मरणोत्सुक...
ते सोशल मीडिया युजर्स होते,
त्यांनी 'त्यांच्या' मरणाची मोठी प्रतिक्षा केली होती.
मोठाले लेख लिहून तयार ठेवले होते,
'त्यांच्या' कवितावर आपल्या कविता पाडल्या होत्या.
श्रद्धांजलीच्या यच्चयावत लंब्या चौड्या पोस्टसनी ते सुसज्ज होते....

ते व्हॉटसऍप युजर्स होते,
त्यांनाही 'त्यांच्या' मरणवृत्ताची खूप घाई झाली होती.
त्यांनी फोटो एडिट करून ठेवले होते,
अश्रू ढाळणाऱ्या स्मायली वाटच बघत होत्या,
'त्यांच्या' मरणाची बातमी आली रे आली की ते या पोस्ट्सचा तुफान मारा करणार होते.
किती प्रोफाइलला आणि कोणकोणत्या ग्रुप्सना 'त्यांच्या' श्रद्धांजलीचे कॉपी पेस्ट फॉरवर्ड कधी एकदा करेन असे त्यांना झाले होते...

मयूरपंखी शब्दकळा


थोडंसं तारवटलेलं आभाळ काय आलं 

गवताच्या पिवळटलेल्या मलूल पात्यांनी माना वर केल्यात ! 

दिगंतापाशी वाऱ्याने पाठ काय टेकली 

सुकल्या पानांनी पानगळीच्या वाटा बदलल्यात.
अस्मान घनगर्द काय झालं 

घरट्याकडं जाणाऱ्या पाखरांच्या फेऱ्या वाढल्यात.

अस्वस्थ मीनार कलत्या नभात दडले काय

काळजात मंदिराच्या कळसांच्या वेदना झंकारून आल्यात !
मेघांची घुम्या गर्दी काय झाली 

आसावल्या डोळ्यांत मायच्या आठवणी दाटून आल्यात. 

दूर रानातुनी केकांचा नाद काय आला 

उदासवाण्या आसमंतात मयूरपंखी शब्दकळा पसरल्यात...

 

- समीर गायकवाड. 

वसुंधरेच्या कविता...



वसुंधरेने आकाशाच्या पानावर लिहिलेल्या कविता म्हणजे वृक्ष !
आम्ही ते तोडून त्याच्यापासून कागद बनवतो त्यावर पोकळ शब्दांचा आलेख मांडतो
आणि त्याला साहित्य म्हणतो !
वसुंधरेच्या कवितेशी कधीही बरोबरी करू न शकणारे साहित्य !
आमची गीतेही खोटीच असतात.
खरी गीते आपल्या आसपासच असतात, जी सृष्टीने रचलेली असतात.

जसे की,
आईच्या हृदयातील शांततेत निद्रिस्त झालेलं गीत तिच्या छातीशी बिलगलेल्या बाळाच्या ओठांवर खेळतं !
पाऊस थेंबांनी आपला देहदाह विझल्याचं गीत माती गाते,
तिची भाषा असते मृदगंधाची !

मरणासन्न झालेला जीर्ण वटवृक्ष कोसळण्यासाठी तिष्टत असतो
अन चकाकणारी सौदामिनी त्याच्यावर झेपावते,
वटवृक्षाचा कोळसा होतो पण मरतानाही तो गीत गातो.
त्याची भाषा असते मिठीची !

वसुंधरा जेंव्हा रुसते तेंव्हा
तिला रिझवण्यासाठी पिसाळलेले ढगही आत्ममग्न होऊन दोषानुभूतीने काळे ठिक्कर पडतात.
वसुंधरेनेच लिहिलेल्या कवितेला आर्त शब्दात गाऊ लागतात,
वृक्षांपाशी आपला निरोप देतात अन एके दिवशी संततधार बरसून तिला चिंब भिजवतात.
ते गीत असते मिलनाचे !

अप्सरेच्या तलम केसांत माळलेल्या गजऱ्यातली दुर्मुखली फुले मुकीच राहती
झाडांवरून गळून पडणारी कोमेजली फुले आनंदे गिरक्या घेत गीत गाती,
त्यात असते तत्व जगण्याचे, हसऱ्या कळीच्या जन्मापासून ते सुखद मृत्यूचे !

असलं काही आपण रचू शकू,
तेंव्हा आपल्या शब्दांना कविता म्हणता येईल,
गीत म्हणता येईल,
साहित्य म्हणता येईल.
तोवर आपला केवळ पोकळ शब्दखेळच चालू आहे असं म्हणायचे......

- समीर गायकवाड.

खलिल जिब्रानच्या कवितेवरून सुचलेलं..

सावली..

तिला मी शेवटचे कधी भेटलोय 
नेमके आठवत नाही
पण ती सांज खूपच मोठी होती, 

सरता सरली नाही.

काळजाचे डोळे करून 

वाट पाहणारं कुणी असेल का,
की आताही सांज झालीय 

म्हणून काय घरीच जायचं का ?

पूर्वी सांज होताच 

पाखरांचा चिवचिवाट असायचा
आता सूर्यास्त होता 

जीवाची पिसे छिलून निघतात
घरी जाताच 

डोळ्यातला संधीकाळ आरशात उतरतो.
एक सावली नकळत पाठीवर हात ठेवून जाते, 

मी तृप्त शहारतो !

- समीर गायकवाड 

~~~~~~~~~~~~~

ही कविता माझ्या आईसाठी लिहिलीय...

पुस्तकांचा अर्थ ....


पुस्तकांचा अर्थ.. 

 

तिच्या चेहऱ्याचं पुस्तक मन लावून वाचलं
तरीही प्रेमात उत्तीर्ण झालो नाही
दरम्यान पाठ्यक्रमाची क्रमिक पुस्तकेही कशीबशी चाळत गेलो,
खूपच रटाळ होती ती.
निकालात जेमतेम काठावर तगलो!
तरीही आयुष्याचा पट मात्र मखमली झालाय.

सोबतीला सहाध्यायी असणारे काही खूप हुशार होते
मन लावून अभ्यास केला त्यांनी,
मास्तर म्हणायचे,

'बघ, असं पुस्तकी किड्यासारखं पानापानात शिरावं लागतं मग कुठं यश मिळतं!"
सर्व कसोट्यावर त्यांनी अफाट गुण मिळवले
त्यांच्या आयुष्याचा पट तर आता सोनेरी झालाय.

मात्र एक फरक झालाय
वयाची चाळीशी उलटल्यावरही त्यातले काही प्रेमाच्या शोधात आहेत,
काही आयुष्याचा अर्थ धुंडाळताहेत
त्यांचा तो सुवर्णपट आतून काटेरी असल्याचा शोध कालच लागलाय...
बरं झालं, तिच्या चेहऱ्यावरचं पुस्तक मी पूर्वीच वाचलंय.
आता केवळ मध्यात आलोय पण तृप्तता शिगोशिग भरलीय!

दोस्तहो, पुस्तकं वाचलीच पाहिजेत

पुस्तकं जीवन समृद्ध करतात, नवा आयाम देतात

आयुष्य घडवतात;
त्यांच्या जोडीने जिती जागती माणसंही वाचता यायला हवीत
पुस्तकांचा अर्थ मग अधिक खोलवर उलगडत जातो!


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Tuesday, 16 April 2019

प्रेम


मी अंगण होतो तू प्राजक्त हो, तू तुळस हो मी वृंदावन होतो
राखण घराची करताना गवाक्षातुन, घनश्याम बघ कसा डोकावतो!
मी माती होतो तू आभाळ हो, तू पाऊस हो मी वीज होतो,
पिऊनी मृदगंध फिरताना, परसात धुंदवारा बघ कसा गुणगुणतो !
मी बीज होतो तू अंकुर हो, तू तहान हो मी पाणी होतो,
मातीतून उगवलेलं स्वप्न हिरवं पाहताना, विधाता बघ कसा हरपतो !
मी वृक्ष होतो तू सावली हो, तू बासरी हो मी स्वर होतो
साजसंगीत आपल्या सुरांना चढवताना, निसर्ग बघ कसा डोलावतो  !
मी चांदणं होतो तू उजेड हो, तू वात हो मी ज्योती होतो.
अक्षरगाणं संसाराचं ऐकताना, तल्लीन होऊनि विठू बघ कसा हसतो !
मी कपाळ होतो तू गंध हो, तू तबक हो मी निरंजन होतो
चिरंतन आपुल्या अगाध प्रेमाचं, निहंता बघ कसं औक्षण करतो !
मी प्रयत्न होतो तू कर्तृत्व हो, तू नियती हो मी प्रारब्ध होतो 
जगणं जरी असलं कळसूत्री तरी, प्रेम मात्र आपण खरंखुरं करतो !   

- समीर गायकवाड.

Tuesday, 9 April 2019

पानातलं मन


बैलं चालती जोडीनं, रान हासतं पानात 
वेली डुलती वारयावरी, पानं वाजवती शीळ 
वारा शिरतो पिकात, पीक हालतं वेगानं 
माती घुमते शिवारात, गाय हंबरे रानात 
मेघ उतरे डोंगरात, काळीज डोंगराचं होई 
डोळे वाहती भरून, पाऊस उतरतो रानात 
रान फुलते तरारून, फुलं उमलती देहात 
बैल चालती जोडीनं, पानं हासती मनात !

- समीर गायकवाड.

Tuesday, 26 March 2019

घरंगळलं आभाळ


घरंगळलं आभाळं तुझ्या कोयरी डोळ्यांत
मनं खिल्लारं धावून गेलं चौखूर दिशांत
गोंदण दंडाचं दिसतां उडती कारंजी काळजात
हसली पाखरं खुदकन जुंधळ्याच्या ऐन्यात
हळदल्या पावलांनी माती जाई हरखून
भर उन्हातलं लागिरं पारंब्याच्या सावल्यात
रान झपाटलं तुझ्या चंदनगंधी देहात
गाभुळलं उन्हं तलम कायेला शिवून
उधाणल्या अंगातला घुमं पारवा जोरात
गेली लाजून झाडं वेली गेल्या झिम्माडून
गाणं प्रेमाचं गातंया उभं शिवारं नाचत...

लेखणीच्या लक्ष जिभांनी

रोजच्या सवयीने इकडे साहित्यिकांनी  आभाळ विकायला काढले  तिकडे आंदोलनकर्त्यांनी रक्त मांसाच्या समिधा केल्या रोज त्याच त्या गमजा बघून वैतागलेल्...