Thursday, 15 November 2018

पाकोळ्या


रात्री ज्या मैफलीत बसलो होतो तिथल्या एका तप्त झुंबराचा तुकडा उडून समोर पडला
त्यावर पडलेल्या कोवळ्या सूर्यकिरणांनी तिच्या दमलेल्या चेहऱ्याला हळू पुसून घेतलं
आरक्त झालेल्या तिच्या गालावरचा लालिमा मग अधिकच खुलून उठला.
तेव्हढयात
रात्रभर जळत राहीलेल्या मेणबत्तीच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या मेणात पडलेल्या 
एक-दोन पाकोळ्यांनी सर्व ताकद एकवटत पंख हलवून तिच्या सौंदर्याला दाद दिली
आणि मगच ते जीव निमाले.


- समीर गायकवाड 

Wednesday, 14 November 2018

दिक्कालाच्या सीमेवर


सोसाट्याच्या वाऱ्यानं झाडाची पानं न पानं उपसून काढली
डेरेदार जुनाट झाड मुळासकट उपसून निघालं
फांद्यावरच्या घरट्यांसकट कोसळलं
रणरणत्या उन्हांच्या साक्षीत गहिवरलेल्या मातीने
गर्भातली काही मुळं घट्ट धरून ठेवली.

दिवस काही असेच शुष्क गेले
एक अवकाळी पाऊस काय झाला
मातीच्या गर्भातल्या कोमेजल्या मुळांनी
जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
आता लवकरच मातीच्या आभाळभर अस्मितेनं
एक अंकुर फुलून येईल.

अंधारलेल्या दिक्कालाच्या सीमेवर
तेव्हा मी उभा असेन औक्षणासाठी
डोळ्यांचे दिवे घेऊन!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 

स्वप्न...


विस्तवात चुलीच्या तेवता स्वप्न तलम 

भाकरीच्या चंद्रात मन झिरपते अल्वार .

परातीतल्या पिठात ओघळतो नितळ काळ,

मायेच्या पीठभरल्या हाती हरपते भूक.
शाडू रंगल्या भिंती जणू जरीच्याच तार,
चंद्रमौळी छपराला देती भुईतून आधार.

कवडशात तिथल्या पाझरे सारेच हे सुख,

शेण सारवल्या भुईची मऊ किती मखमल,
टेकताच पाठ जणू फिरे मायेचाच हात.
डोळ्याच्या ओलीतून मायची छबी नाही जात..

येई परत फिरूनी जीव माझा रे तिथं,

एका खोलीच्या संसारात जीव रमतो जिथं
सारी सुखं नांदती माझ्या विठ्ठलासंगं तिथं

- समीर गायकवाड.

Tuesday, 6 November 2018

काजळ


उगीच संध्याकाळ होते
ती येणार नाही हे माहित असूनही
फिरून फिरून तिचीच आठवण घेऊन परतते
मनाच्या भिजलेल्या उंबरठयावर थबकते.
मनाचं दार उघडलं नाही तरी या आठवणी हटत नाहीत.
हळूहळू संधीप्रकाश विरत जातो आणि
अंधार तिच्या डोळ्यातलं काजळ घरभरात प्रसवत राहतो
मग तिला अनुभवता येतं !

आताशा मी तिची आठवणच काढत नाही,
बस्स सांज व्हायची वाट पाहतो...

- समीर गायकवाड

Thursday, 25 October 2018

लज्जा


तिच्या पदराआडच्या नितळ मखमली कायेला स्पर्शून
उन्हाचे अवखळ कवडसे झर्रकन माझ्या पुढ्यात आले
त्यांच्या हसऱ्या मुद्रा पाहून विचारलं, काय झालं ?
लाजेनं चूर होत ते उद्गारले, "काही नाही, काळजात चर्र झालं !"

- समीर गायकवाड 

Tuesday, 9 October 2018

गंध कवितेचा

लग्न होऊन ती सासरी गेलीय.

घरासमोरून तिच्या जाताना

खिडकीची चोरटी नजर अजूनही माझ्यावर असल्याचे भास होतात.

 

अंगणातला तिच्या

म्लान झालाय मोगरा अन ओसरलाय बहर अबोलीचा.

 

बिलोरी सावल्यांतुनी वेलीच्या

दरवळ तिच्या लडिवाळ बटांचा वाहतोय अजूनही.

 

पहिल्या माहेरपणाला आल्यावर

तिच्या सौंदर्याच्या शब्दकळा काळजात साठवून घेतल्यात.


तेंव्हापासून कवितेत माझ्या

गंध तिचा दरवळतोय....

 

Wednesday, 12 September 2018

मातीचा लोभ सुटत नाही ..


उमर जरी माझी ढळली तरी कष्टाचे देणे फिटत नाही
प्रारब्धाच्याही छिलल्या रेषा, कासरा हातचा सुटत नाही

माझ्याच जीवाचे जीर्णदुखणे सांगू किती, हे उमगत नाही
कळता मुक्या जीवांचे बोल, वाटते सुख माझे सरत नाही

वेदनांचे ढोल वाजवू किती, सुखाचा आलाप संपत नाही
अश्रूंनी चेहरा झाला म्लान जरी, तेज सुखाचे लपत नाही

उगाच का उदास व्हावे? मळभ मनीचे आता तरत नाही
वेलींचे नक्षत्रवेडे फुल, कस्तुरीच्या गंधभारास झुरत नाही

कलत्या सांजवृक्षाची नादमय पानगळ रानात हुरहुरत नाही
घनगर्द सावल्यांच्या नक्षीचा चकवा, गावात भटकत नाही

जगणे उरलेच किती म्हणून चकोरचांदणे हिरमुसत नाही
उमर जरी माझी ढळली तरी, संसारसुखाचे देणे फिटत नाही.

भाळीच्या थिजल्या रेषा, घनमोह अंतरंगाचा तुटतच नाही
उरले दिवस किती अंतरी, परी मातीचा लोभ सुटत नाही.. 

Tuesday, 11 September 2018

केसरिया बालमा

केसरिया बालमा

'ती' पहिल्यांदा भेटली तेंव्हा कितीतरी क्षण मंतरलेले होते,
घड्याळातील काटे सुद्धा डोळे विस्फारून आमच्याकडे पाहत होते.
तिच्याशी गळाभेट झाली नाही की एखादी मिठी देखील मारली नाही,
नंतर वाटले हे राहिलेच की !
ते क्षणच इतके मोहित होते की
हे करावे की ते करावे याचा विचार मनात डोकावला नाही,
बस्स काही क्षण हातात हात घालून उभे होतो,
जणू काही जन्म जन्मांतराची जुनी ओळख असावी.
ती द्रोणागिरीवरची संजीवनी आणि
मी शब्दफुलांच्या कोमल परागकणांचा चाहता !
त्या भेटीत काही तरी जादू होती, अनामिक ओढ होती, आपुलकी होती, आस्था होती.
नव्हता विकारांचा लवलेश की नव्हती कुठली आसक्ती !

त्या दिवसानंतर भारलेल्या अवस्थेत मी जगत गेलो
बहुधा ती भारलेलीच असावी, तिचेच गारुड माझ्यावर झाले !
नंतर अधाशासारखा कितीतरी दिवस बोलत होतो, कधी बोलायला न मिळाल्यासारखं !

Friday, 31 August 2018

तू ....

अबोल्यातही एक अर्थ असतोनिशब्दतेतही एक हुंकार असतो,
नसलो जवळ री, स्पंदनात तुझ्या मी असतो....
प्रत्येक प्रश्नाला उत्तर नसते, अनुत्तरीत होण्यातही एक उत्तर असते,
नच उतरलो शब्दात तरी, काव्यात तुझ्या मी असतो .... 
दिसण्यातही एक आनंद असतो, दृष्टीचाही एक अथांग शोध असतो,
नसलो भोवताली तरी, डोळ्यांत तुझ्या मी असतो.
कपाळीच्या बटेतही एक माधुर्य असतं, ओठांतही एक आसक्ती असते,
नच स्पर्श केला तरी, देहगंधात तुझ्या मी असतो !
जवळीकीचाही एक कैफ असतो, कैफाचंही एक आत्ममग्न जिणं असतं,
नच सहवास लाभला तरी, परिघात तुझ्या मी असतो.

Wednesday, 22 August 2018

सटर फटर


तू गुलाब मी काटा, मी चपाती तू आटा

तू केस मी बटा, मी खोबरेल तू जटा

तू पाणी मी लाट, मी आलू तू चाट

तू खरी मी खोटा, मी झारी तू लोटा.

सांग तुझ्याशिवाय कशा कटणार आयुष्याच्या या काटेरी वाटा ?


Tuesday, 7 August 2018

सोनपाखरू....



काळ्यापांढऱ्या ढगांची दाटी होऊन मेघगर्जना काय झाली,
उन्हात होरपळून गेलेल्या शुष्क पानांनी मिठीच मारली.

दोन चार थेंब वळवाचे आपल्याच नादात काय कोसळले,
माळावरच्या माना पडलेल्या गवताचे भालेच अलगद झाले.

वरुणोत्सुक वारा अंगात आल्यासारखा बेधुंद काय नाचला,
सुरकुतल्या लालपिवळ्या पिकल्या पानांनी बिस्तरा बांधला.

चंद्रमौळी गोठयाच्या कुडात शीतोष्ण सरी काय झिरपल्या,
रेशमी गाईंच्या डोळ्यात अलवार अश्रूधारा पाझरल्या.

पहिला पाऊस आला म्हणून कळ्यांनी ठेका काय धरला,
पाण्याच्या ओघळासरशी मुंगळयांनी रस्ता त्यांचा बदलला.

जलधारांत भिजताच चराचर सगळे कसे गहिवरून गेले,
पण पंख नाही भिजले म्हणून सोनपाखरू हिरमुसुन की गेले.....

- समीर गायकवाड.

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...