Friday, 21 December 2018
Wednesday, 12 December 2018
ऋतू
बाबांनो तुमचं वय किती, काही सांगता येईल का ?
एकसाथ सगळी पानं देठापासून कसनुशी हसली
त्यातलंच एक पिकलं पान थरथरत म्हणालं,
ऋतू बेभरवशाचे झाल्यापासून
ज्या फांद्यांवर पक्षीच आले नाहीत
- समीर गायकवाड
Thursday, 6 December 2018
घुटमळ...
अमावस्येच्या अंधाराचा त्रास काहीच नसतो मात्र
आकाश जेंव्हा लक्ष चांदण्यांनी
लखलखतं तेंव्हा
आपल्या एकटेपणाची जाणीव
अधिक तीव्र होते...
संवाद अर्ध्यात सोडून तू
गेलीस ती रात्र
अजूनही तिथेच रेंगाळते
आहे
रात्रीच्या त्या
वळणावरती तू कधीही आलीस तर
माझी सावली दिसेल तुला...
हवे तर विचार चंद्राला,
जो खिडकीतून दिसत असेल
तुला !
अंगणात कोसळलेल्या उल्का सांगतील तुला
घुटमळतोय तिथेच आत्मा माझा
!
- समीर गायकवाड
Thursday, 15 November 2018
पाकोळ्या
रात्री ज्या मैफलीत बसलो होतो तिथल्या एका तप्त झुंबराचा तुकडा उडून समोर पडला
त्यावर पडलेल्या कोवळ्या सूर्यकिरणांनी तिच्या दमलेल्या चेहऱ्याला हळू पुसून घेतलं
आरक्त झालेल्या तिच्या गालावरचा लालिमा मग अधिकच खुलून उठला.
तेव्हढयात
रात्रभर जळत राहीलेल्या मेणबत्तीच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या मेणात पडलेल्या
एक-दोन पाकोळ्यांनी सर्व ताकद एकवटत पंख हलवून तिच्या सौंदर्याला दाद दिली
आणि मगच ते जीव निमाले.
- समीर गायकवाड
Wednesday, 14 November 2018
दिक्कालाच्या सीमेवर

सोसाट्याच्या वाऱ्यानं झाडाची पानं न पानं उपसून काढली
डेरेदार जुनाट झाड मुळासकट उपसून निघालं
फांद्यावरच्या घरट्यांसकट कोसळलं
रणरणत्या उन्हांच्या साक्षीत गहिवरलेल्या मातीने
गर्भातली काही मुळं घट्ट धरून ठेवली.
दिवस काही असेच शुष्क गेले
एक अवकाळी पाऊस काय झाला
मातीच्या गर्भातल्या कोमेजल्या मुळांनी
जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
आता लवकरच मातीच्या आभाळभर अस्मितेनं
एक अंकुर फुलून येईल.
अंधारलेल्या दिक्कालाच्या सीमेवर
तेव्हा मी उभा असेन औक्षणासाठी
डोळ्यांचे दिवे घेऊन!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
स्वप्न...
विस्तवात चुलीच्या तेवता स्वप्न तलम
भाकरीच्या चंद्रात मन झिरपते अल्वार .
परातीतल्या पिठात ओघळतो नितळ काळ,
मायेच्या पीठभरल्या हाती हरपते भूक.
शाडू रंगल्या भिंती जणू जरीच्याच तार,
चंद्रमौळी छपराला देती भुईतून आधार.
कवडशात तिथल्या पाझरे सारेच हे सुख,
शेण सारवल्या भुईची मऊ किती मखमल,
टेकताच पाठ जणू फिरे मायेचाच हात.
डोळ्याच्या ओलीतून मायची छबी नाही जात..
येई परत फिरूनी जीव माझा रे तिथं,
एका खोलीच्या संसारात जीव रमतो जिथं
सारी सुखं नांदती माझ्या विठ्ठलासंगं तिथं
Tuesday, 6 November 2018
काजळ
उगीच संध्याकाळ होते
ती येणार नाही हे माहित असूनही
फिरून फिरून तिचीच आठवण घेऊन परतते
मनाच्या भिजलेल्या उंबरठयावर थबकते.
मनाचं दार उघडलं नाही तरी या आठवणी हटत नाहीत.
हळूहळू संधीप्रकाश विरत जातो आणि
अंधार तिच्या डोळ्यातलं काजळ घरभरात प्रसवत राहतो
मग तिला अनुभवता येतं !
आताशा मी तिची आठवणच काढत नाही,
बस्स सांज व्हायची वाट पाहतो...
- समीर गायकवाड
Thursday, 25 October 2018
Tuesday, 9 October 2018
गंध कवितेचा
लग्न
होऊन ती सासरी गेलीय.
घरासमोरून
तिच्या जाताना,
खिडकीची
चोरटी नजर अजूनही माझ्यावर असल्याचे भास होतात.
अंगणातला
तिच्या,
म्लान
झालाय मोगरा अन ओसरलाय बहर अबोलीचा.
बिलोरी
सावल्यांतुनी वेलीच्या,
दरवळ
तिच्या लडिवाळ बटांचा वाहतोय अजूनही.
पहिल्या
माहेरपणाला आल्यावर,
तिच्या
सौंदर्याच्या शब्दकळा काळजात साठवून घेतल्यात.
तेंव्हापासून कवितेत माझ्या,
गंध
तिचा दरवळतोय....
Wednesday, 12 September 2018
मातीचा लोभ सुटत नाही ..

उमर जरी माझी ढळली तरी कष्टाचे देणे फिटत नाही
प्रारब्धाच्याही छिलल्या रेषा, कासरा हातचा सुटत नाही
माझ्याच जीवाचे जीर्णदुखणे सांगू किती, हे उमगत नाही
कळता मुक्या जीवांचे बोल, वाटते सुख माझे सरत नाही
वेदनांचे ढोल वाजवू किती, सुखाचा आलाप संपत नाही
अश्रूंनी चेहरा झाला म्लान जरी, तेज सुखाचे लपत नाही
उगाच का उदास व्हावे? मळभ मनीचे आता तरत नाही
वेलींचे नक्षत्रवेडे फुल, कस्तुरीच्या गंधभारास झुरत नाही
कलत्या सांजवृक्षाची नादमय पानगळ रानात हुरहुरत नाही
घनगर्द सावल्यांच्या नक्षीचा चकवा, गावात भटकत नाही
जगणे उरलेच किती म्हणून चकोरचांदणे हिरमुसत नाही
उमर जरी माझी ढळली तरी, संसारसुखाचे देणे फिटत नाही.
भाळीच्या थिजल्या रेषा, घनमोह अंतरंगाचा तुटतच नाही
उरले दिवस किती अंतरी, परी मातीचा लोभ सुटत नाही..
Tuesday, 11 September 2018
केसरिया बालमा

'ती' पहिल्यांदा भेटली तेंव्हा कितीतरी क्षण मंतरलेले होते,
घड्याळातील काटे सुद्धा डोळे विस्फारून आमच्याकडे पाहत होते.
तिच्याशी गळाभेट झाली नाही की एखादी मिठी देखील मारली नाही,
नंतर वाटले हे राहिलेच की !
ते क्षणच इतके मोहित होते की
हे करावे की ते करावे याचा विचार मनात डोकावला नाही,
बस्स काही क्षण हातात हात घालून उभे होतो,
जणू काही जन्म जन्मांतराची जुनी ओळख असावी.
ती द्रोणागिरीवरची संजीवनी आणि
मी शब्दफुलांच्या कोमल परागकणांचा चाहता !
त्या भेटीत काही तरी जादू होती, अनामिक ओढ होती, आपुलकी होती, आस्था होती.
नव्हता विकारांचा लवलेश की नव्हती कुठली आसक्ती !
त्या दिवसानंतर भारलेल्या अवस्थेत मी जगत गेलो
बहुधा ती भारलेलीच असावी, तिचेच गारुड माझ्यावर झाले !
नंतर अधाशासारखा कितीतरी दिवस बोलत होतो, कधी बोलायला न मिळाल्यासारखं !
Friday, 31 August 2018
तू ....
Wednesday, 22 August 2018
Tuesday, 7 August 2018
सोनपाखरू....

काळ्यापांढऱ्या ढगांची दाटी होऊन मेघगर्जना काय झाली,
उन्हात होरपळून गेलेल्या शुष्क पानांनी मिठीच मारली.
दोन चार थेंब वळवाचे आपल्याच नादात काय कोसळले,
माळावरच्या माना पडलेल्या गवताचे भालेच अलगद झाले.
वरुणोत्सुक वारा अंगात आल्यासारखा बेधुंद काय नाचला,
सुरकुतल्या लालपिवळ्या पिकल्या पानांनी बिस्तरा बांधला.
चंद्रमौळी गोठयाच्या कुडात शीतोष्ण सरी काय झिरपल्या,
रेशमी गाईंच्या डोळ्यात अलवार अश्रूधारा पाझरल्या.
पहिला पाऊस आला म्हणून कळ्यांनी ठेका काय धरला,
पाण्याच्या ओघळासरशी मुंगळयांनी रस्ता त्यांचा बदलला.
जलधारांत भिजताच चराचर सगळे कसे गहिवरून गेले,
पण पंख नाही भिजले म्हणून सोनपाखरू हिरमुसुन की गेले.....
- समीर गायकवाड.
Tuesday, 3 July 2018
सावलीचे बेट

जास्वंदी बालपणाला नियतीचे बाभूळकाटे होते
इवलेसे दात होते पण चणे मात्र पोलादाचे होते
काट्याकुट्यांच्या वाटेवर अनवाणीच पाय होते
मातीची कूस होती अन् आभाळाचे छप्पर होते
वावटळींच्या सोबतीला रखरखणारे ऊन होते
कोरडे होते ओठ तरी डोळ्यात मात्र पाणी होते
कपडे होते फाटके तरी शील मात्र शाबूत होते
पोटपाठ एक झाली तरी हात पसरलेले नव्हते
पाऊल घसरलं तरी सावरायला मायबाप होते
झिजला जरी देह तरी समर्पणातच सुख होते
सावलीच्या बेटावर आता मोरपंखी आयुष्य जगतो
गतकाळाच्या आठवणींनी तरीही जीव व्याकुळतो ...
Tuesday, 13 March 2018
Monday, 8 January 2018
गंधवेणा
रात्र सरपटताच देहावरती खडबडीत
गळून पडतो मोगऱ्याचा फणा
चंद्र रडतो कोनाडयात, छळतात उरलेल्या त्वचेवर सोलल्याच्या खुणा
कैक येतात, जातात ; छेडत राहतात विवस्त्र देहातली आर्त छंदवीणा
सकाळ दुष्ट होताच येतात मरणाची
सुखस्वप्ने, भरवित बाजार जुना !
गंधभारित वेदनांचा जत्था मळक्या
देहातला, कळवळतो पुन्हा पुन्हा...
शहरातील बेघर भिकारी
शहरातील बेघर भिकारी रात्री रिकाम्या पोटी धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...
-
वाळूतले ठसे तुझे, केंव्हाच मिटून गेले पण देहाचा गंध अजुनी दरवळतो किनाऱ्यावर त्या गंधवेडापायी तर, समुद्रास भरती येत नसेल ना ? तुला भेटलो...
-
पाऊस 'काळ्या माती'तही पडलाय आणि 'लाल माती'वरही त्यानं उच्छाद मांडलाय पुराचं पाणी मंदिरातही शिरलंय आणि मास्जिदीतही शि...
-
रुळाजवळ तुटून पडलेली ती बत्तीस पावलं चालून चालून भेगाळून चिरून गेलेली होती. त्यांच्या देहावरून रेल्वे गेली तेंव्हा ते थकलेले जीव निद्राधीन...
-
कालच तुझ्या शहरात जोरदार पाऊस पडलाय. मेघांना विचारलंस का, की ते कुठून आले होते ? पावसात चिंब भिजतानाची तुझी तस्वीर घेऊन मेघ सकाळीच परतले...
-
वेळ मिळताच मी बागेत चक्कर टाकून येत असतो. अलीकडेच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, आपण दोघं ज्या बाकावर बसायचो, नेमक्या त्याच बाकावर आता एक तरत...







