Wednesday, 8 May 2019

रानभूल



आलं आभाळ दाटून माझ्या डोळ्यांच्या पांदीत
गेला पदर फाटून तुझ्या संसाराच्या सांदीत 

कशी झाली पानगळ कसं आलं हे वादळ
दैना झाली जीवाची आता सोसवेना कळ !

चूक झाली कोणाची सजा भोगतंया कोण ?
बाकी उरली न काही तरी फिटेना हे ऋण 

चित राहीना थारयावर मन उडं वाऱ्यावर
काळजाचं होई पाणी दुःख झुलं झुल्यावर 

गेलं पंखातलं बळ आलीं शेवटची भोवळ
तुटली बंधनं सारी वाहते कायेची ओंजळ

गेला पाऊस पाडून आता मागं उरे रानभूल
येता सय तुह्या ऊरात लागं माझीच चाहूल

गेलं आभाळ रंगून माझ्या चितेच्या मेंदीत
गेलं आयुष्य उसवून तुझ्या स्वप्नाच्या चिंधीत !!

- समीर गायकवाड

भेट



मान्सूनचा निरोप घेताना पाऊस कासावीस होतो, तिच्या बंद दारासमोर रस्ता हरवल्यागत रेंगाळतो.

अंगणातल्या निष्पर्ण वेलींची आर्त गळाभेट घेतो, दारासमोर वाढलेल्या गवतात हलकेच घरंगळतो.

दारावरल्या कुलुपाच्या छिद्रातून डोकावून पाहतो, खिडकीच्या फटीतून जमेल तितके अंग घुसळतो.

परसदारापाशी जाऊन गुडघ्यात डोकं खुपसून बसतो, सांज होताच अखेर गर्दमेघांचे अश्व उधळतो.

कुंद ढगात तरमळणाऱ्या माझ्या आत्म्यास मिठी मारतो, भेट यंदाही झाली नाही म्हणून अश्रू ढाळतो !!

- समीर गायकवाड.

नसती तहान तर ...



नसती तहान तर बरे झाले असते,
अष्टौप्रहर वणवण पायपीटेची थबकली असती.
निवडुंगे बोटाची झाली नसती
भार नसता वाहावा लागला बोडक्या मस्तकी हंडे कळशांचा.
दुधपीते तान्हुले घरी टाकून झोळीत
रणरणत्या भुईच्या वाळवंटी नसते लागले
माझ्या मायबहिणींचे अगतिक मेळे.

स्वर्गाची वाट



स्वर्गाच्या सर्व वाटा मातीतूनच जातात,
मातीचीं नाती जपता त्या आपसूक गवसती !
मातीतून उगवणारे अंकुर साठवता मनी
झाडे घनगर्द देती शीतल सावली
जपता काळजागत मातीत रोवलेल्या बीजां
या वाटांची गावे बहरदार होती.
थेंब मातीत कोसळणारे टिपता आसवल्या डोळ्यांनी
दारे मोक्षाची कोरीव खुलती
ओठी ठेवता मातीचे अजरामर गाणे
होतो परिचय स्वर्गीय गीतांच्या स्वरांशी,
धूळ जित्राबांच्या खुरांची मातीत राबत्या मस्तकी लागता
उभारती यक्ष-गंधर्व पायाशी
गंध भाळी मातीचा ल्येता कुणी
वाट अलगद नेती वैकुंठी !

- समीर गायकवाड

उत्तर



आठवणींनी तुझ्या चिंबआसवात भिजल्या रात्री किती

सूर सतारीच्या काळजातलेआणिक जपायाचे तरी किती ?

 

तू गेलीस उधळूनी अल्वारखेळ अंतरीच्या भावनांचा

आठवणींची तुझ्या बकुळफुलेसांग वेचायची तरी किती ?

 

तू मांडलीस जगभरात आरासभग्न स्वप्नांची माझ्या

भासांनी तुझ्या बेचैन होतरात्री जागवायच्या तरी किती ?

 

तू रचुनी देखावा उत्कट प्रेमाचाकेलास तमाशा माझा 

नावाची तुझ्या अनिवारओढायची जपमाळ तरी किती ?

 

तू जाणलेस कधी न मोल शपथांचेघात वचनांनी केलास

काजळमायेत आणाभाकांच्याअजून गुंतायचे तरी किती ? 

 

उलगडले असतेस जरीअंतरंग मनीचे सहज तू कधी

मिळाले असते उत्तर मजलाआणिक जगायचे तरी किती ? 

तालवीणा..



ज्या रस्त्याने तू गेलीस तो अजूनही दिशांना तुझा पत्ता विचारतो आहे


त्या मातीतल्या तुझ्या पुसट पाऊलखुणात जीव अजूनही उस्मरतो आहे.

तू गेल्यानंतर मोहोर आंब्याला आला नाही की बहर फुलांनाही आला नाही

वेणुनाद पानांतला पुन्हा न ऐकला न वाऱ्यावर गंध फुलांचा वाहत आला !

ज्या दिशेने तू गेलीस ती दिशा अजूनही क्षितिजाकडे डोळे लावून आहे

त्या दिशेतल्या तुझ्या घुस्मटलेल्या हुंदक्यात सूर्य अस्ताचा कलून आहे !

तू गेल्यानंतर मंजुळा हसल्या नाहीत की वृंदावन गहिवरून गेले नाही

सज्जातली तुझी प्रतिमा पुन्हा न दिसली ना चाहूल तुझी घराला आली !

ज्या पंचतत्वात तू गेलीस ते अजूनही निरांजन तेवताना हळवे होते

उतरत्या चेहऱ्याने अंगणातले चंद्रबिंब शोधात तुझ्या सैरभैर होते !


तू गेल्यानंतर ऐन्यात कुणी पाहिलेच नाही की दारी रांगोळी रेखाटली नाही

तू गेलेल्या रस्त्यापाशी येताच तुझ्या असण्याचा भास पिच्छा सोडत नाही !

ज्या घटिकेस तू गेलीस ती अजूनही दिग्मूढ थिजून काळजात आहे

अल्वार स्पंदनात देहाच्या तुझीच तालवीणा अजून झंकारत आहे !!

- समीर गायकवाड

पाऊसवेडा चंद्रचकोर ....


छत्तीस तासांपासून पाऊस पडतोय पण झाडांच्या बुंध्यालगत मातीचा थर अजूनी कोरडाच आहे,
त्रिकोणात थवे करून उडणारया पक्षांचे पंख कोरडे आहेत,
गोजिऱ्या फुलांच्या पाकळ्या किंचितच ओल्या आहेत,
झाडांच्या पानांवरून क्वचित एखादा थेंब ओघळतोय,
पर्जन्यवेडया गवताच्या पात्यांची पेंग अजून सरली नाहीये,
बाभळीच्या घरट्यातील काड्यावर नवाडा पाहुणा डोळे झाकल्या पडुन आहे,
झाडाच्या ढोलीतले तांबट-सुतारांचे जग अजुनी उदास आहे,
खोल गेलेल्या विहिरीच्या तळाशी गाळाचेच अजुन साम्राज्य आहे,
कपारीतल्या पारव्यांचे गहिरे निश्वास तसेच आहेत,
गोठ्यातल्या गाईंच्या डोळ्यात शुष्क पाचोळ्याचे तेच प्रतिबिंब थिजून आहे,
वंगणओल्या चाकांनाही चिखलाचा नुसताच अजुनी ध्यास आहे,
तिफणीतले चुकार बियाणे मातीच्या गर्भस्वप्नात नुसतेच दंग आहे,
नभात डोकावणारया देवळाच्या टोकदार कळसाची पर्जन्याभिषेकाची आस
अजुनी टिकून आहे,
मेघांत गवसणी घातलेले मस्जिदीचे आत्ममग्न मिनार कोरडेच उभे आहेत,
मातीच्या कुशीतले अर्धोन्मिलित अंकुर म्लानमाना टाकूनही सचेत आहेत,
चंद्रमौळी घराचे छत मेघास कडाडून भेटण्या अजूनही उत्सुक आहे,
'भिंतीतली ओल, गेली कुठे रुसून' म्हणत आढयातले वासे सुकून गेले आहेत,
मंजुळा हरवलेली तुळस मेघश्यामाच्या आणाभाकात मश्गुल अजून आहे,
दारापुढचा गंधवेडा पारिजातक नक्षत्रांच्या मृगजळाशी आस लावून आहे,
परसातली जाईजुई वाऱ्याच्या सांगाव्यावर पावसाचे स्वप्नझुले झुलवत आहे,
उन्हात वाहिलेल्या माथ्यावरच्या चिवट हंडयांची माळ्यावर बोळवण व्हायची अजुनी बाकी आहे,
पुठ्ठा मोडून पडलेल्या वहीतल्या पानांच्या कागदी 'होडया' कपाटातल्या ड्रॉवरमध्ये पडून आहेत,
हिरमुसला झालेला रेनकोट अजूनही दाराआडच्या हुकात लटकतो आहे,
तिथेच खाली अंगाच्या काडया मुडपून छत्रीची मुठ अबोल झालीय,
पर्जन्योत्सुक चराचराच्या मनातले मेघमल्हार अजूनही भारित आहेत.
देहातल्या मातीच्या आभाळवेणा अजूनही सुरूच आहेत अन
पाऊस हा असा हलकाच येऊन स्पर्शुनी जातोय
हितगुज मातीशी करुनी जातोय,
जणू शस्त्रे टाकून बसलेल्या पार्थास माधव जीवनसार ऐकवितोय !

सारे सारासार जाणूनही मी अजून कोरडाच आहे
म्हणूनच की काय,
'मातीच्या कानात पाऊसथेंबानी सांगितलंय तरी काय ?'
हे उमगायला आणखी बराच काळ लागेल !
एकूणच काय,
माती आणि आभाळ यांचा काहीतरी तहनामा झालाय
अन मधल्या मध्ये माझ्या जीवाचा पाऊसवेडा चंद्रचकोर झालाय...

- समीर गायकवाड.

( सर्वत्र संततधार पाऊस पडतोय असं वाचनात येतंय ..इतरत्र काय होतंय नेमकं कळायला मार्ग नाहीये, आमच्या इथेही परवाच्या सांजेपासून पाऊस पडतोय......मात्र एखादा ज्ञानी महात्मा संताच्या अभंगांचे हळुवारपणे, संथ गतीने, शांतगंभीर स्वरात, सखोल जाणीवांसह विश्लेषण करत भावविभोर वर्णन करतो तशी या पावसाची शैली आहे...)

सूर्यास्त



अस्ताला जाणारा सूर्य सोनेरी शिखरांवरून अलगद कलतो
घुमटांतून उत्तुंग क्षितिजात उतरतो. 
पश्चिमेच्या लाल नभांत विरतो
तुळशीच्या शीतल दिव्यात अन् देव्हाऱ्यातील निरंजनात तेवतो.  
पक्षांच्या घरटयात शिणलेली पाठ टेकतो
झाडांच्या ढोलीत बिछाना अंथरतो
प्रेयसीच्या दुखऱ्या पापण्यात ओला होतो
भकाकत्या चुलीच्या अर्धविझल्या निखाऱ्यांना फुलवतो.

हमरस्त्यांवर अंधार शिंपडून 
शेत शिवारातील गवतफुलांवर
पिकपाण्यावर जीव टाकून पुढे जातो. 
निशिगंधाच्या मादक फुलांना जागं करतो
गोठ्यातल्या गायीच्या डोळ्यात झिरपून कासेत पाझरतो 
निळ्याकाळ्या मेघांतून परतणाऱ्या पक्षांच्या डौलदार पंखांवर विसावतो!
वेशीवरच्या पारंब्यात झुलतो, तळ्याकाठच्या गारव्यात रमतो.              

अस्ताला जाणारा सूर्यच
परसदाराशी रुसून बसलेल्या जाईच्या वेलीत घुटमळतो 
खोल गेलेल्या विमनस्क आडाच्या आर्त तळाशी हळूच डोकावून पाहतो
समुद्राच्या लाटांवर लोळून पाण्याच्या तळाशी झेपावतो. 
हरलेल्या मद्यपीच्या वेदनांच्या प्याल्यात तरंगतो
कष्टकऱ्यांच्या भेगाळलेल्या टाचांत रेंगाळतो
फाटक्याच झोपडीतला तलम अंधार गडद करतो
गाबडलेल्या वस्त्यातली विकारांची पाती धारदार करतो
वेश्यांच्या भडक मेकअपमधल्या भयाण आम्लास संपृक्ततो.
जुगाऱ्यांच्या डोळ्यात चमक भरतो,
अंधाराची प्रतिक्षा करणाऱ्या तमाम हिंस्त्र श्वापदांच्या इच्छावासना जागृत करतो!

अस्ताला जाणारा सूर्यच विदीर्ण हृदयांत संध्याछायेची भीती घालतो 
आणि अंधार जन्माला घालतानाच ध्यासमग्न प्रकाशाची बीजे रोवतो.... 

हिशोब




पैंजणसाज गीतांना चढवताना रागदारीस नकळत भुलवशील,

पण चुरगळून पडलेल्या मोगरयास कसे हाताळशील ?

पानात अडकलेल्या गंधवेणा वाऱ्याच्या अल्वार सोडवशील,

पण उधळून विखरलेल्या परागकणांना कसे आवरशील ?

डोहात रुतलेल्या चांदणचकव्यास हलकेच विरघळवशील,

पण डोळ्यात उतरलेल्या धुंदचांदण्याचे काय करशील ?

मेघांत अडकलेली स्वप्नांची किरणे अलगद सोडवशील

पण दिल्या घेतल्या आणाभाकांचे प्रतिबिंब कसे पुसशील ?    

गद्दार वचनांना सुक्तात गुंफताना भावार्थाची फोडणी देशील,

पण शब्दांनी केलेल्या फंदफितूरीला कसे लपवशील ?    

कत्लेआम करताना घातकी सुरयांना सहज धार लावशील,

पण चिंधडया उडालेल्या काळजाची विल्हेवाट कशी लावशील ?        

विकताना शपथांना साज इमानदारीचे हळूच चढवशील,

पण अखेरचा हिशोब करताना कुटील उत्तर काय देशील ?


समीर गायकवाड.

माझ्यातला तू


संतांच्या अभंगात, आत्म्याच्या मृदंगात
समईच्या वातीत, आमराईच्या सावलीत
गवताच्या पात्यात, दगडाच्या जात्यात
नांगराच्या फाळात, जठराच्या जाळात
कृष्णाच्या बासरीत, शिवबाच्या तलवारीत
मेघांच्या अभ्र्यात, पाखरांच्या पंखांत तू!
तू नाहीस जिथे असे ठिकाण कुठे शोधू ?

पक्षांच्या घरटयात, वृक्षांच्या राहुटयात
अर्जुनाच्या बाणात, कर्णाच्या दानात
देवळाच्या कळसात, शंभूच्या पळसात
बीजांच्या अंकुरात, वादळांच्या उरात
विद्रोहाच्या बंडात, शोषितांच्या दंडात
ओवीच्या अक्षरात, गंधर्वांच्या स्वरात तू
तू नाहीस जिथे असे ठिकाण कुठे शोधू ?

भिक्षुकांच्या कटोऱ्यात, स्वप्नांच्या मनोऱ्यात
मनगटाच्या पोलादात, आसवांच्या ओघळात
फुलांच्या देठात, सुरांच्या ओठात
दवाच्या मिठीत, देहाच्या दिठीत
सागराच्या खोलीत, झाडांच्या ढोलीत
मोराच्या पिसाऱ्यात, चितेच्या निखाऱ्यात तू!
तू नाहीस जिथे असे ठिकाण कुठे शोधू ?

अबीरगुलालाच्या गंधात, सतअसतच्या द्वंद्वात
वीरांच्या गाथेत, समरांच्या कथेत
श्रमिकांच्या घामात, गणिकांच्या दुःखात
वारांगनेच्या देहात, तारांगणाच्या डोहात
अंधाराच्या गर्भात, हवनाच्या दर्भात
जीवनाच्या सत्वात, अनंताच्या पंचतत्वात तू!!
तू नाहीस जिथे असे ठिकाण कुठे शोधू ?

आत्मशोधाच्या अंतानंतरच उमगणारा, तोच तू!         

आस


मेघांची झुंबरे आकाशाच्या देही

पक्षी आठवणींचे शोधिती घरटी   

कलता सूर्य गाई तुझीच विराणी. 

दिसशी तू मातीच्या अंकुरातही   

अन गायीच्या आसावल्या डोळी  

अमीट ठसे तुझे शुष्क पायवाटी  

तरी तरंग वाऱ्यावर म्लान नुठती     

भासे अवचित तू येशील परतुनी

झाले मन वेडे आस तुझी घेऊनी


- समीर गायकवाड.  

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय त्यांची खूप मदत...