जाताच
तू, गर्दीत मेघांच्या निर्माल्य अश्रूंचे विखुरले,
बेट
काजव्यांचे निबिड अंधारवनात विरुनी गेले.
वर्ख
चंद्रकोरीचा छिन्नविहिरीत खोल बुडवूनी,
गाळात
काळोखाच्या हुंकार पेरत शब्द निघुनी गेले !
जाताच
तू, भग्न चिऱ्यांचे रुदन आसमंती गहिवरले,
जीर्ण
कातळ शिळांचे अबोल गळे दाट भरुनी आले.
दाहात
दग्धचितेच्या थिजलेल्या वाऱ्यास पेटवूनी,
कळीकपाळीच्या
पुसुनि रेषां भाग्य निघुनी गेले !
जाताच तू, ताटवे लालपिवळे भोवळून गळून गेले,
शेवाळलेल्या
भिंतीस गदगदून विश्वाचे आर्त आले.
मळवट
म्लानपाकळ्यांचा भाळास मातीच्या लावूनी,
पुष्पपक्षांचे
थवे अद्वैताच्या अरण्यकात निघुनी गेले !
जाताच तू, रक्तकर्दमलेले घर अर्ध्यात खचून गेले,
वचनांचे
वृथा सुभाषित कलुषित ओठावर आले
मिनारास
चिरुनी कळसास झुकत्या कलथवूनी
प्रार्थनांचे
कलेवर दारात प्रारब्धाच्या मन ठेवुनी गेले !
जाताच तू, मनी चराचराच्या किल्मिष की दाटुनी आले
जाताच
तू, प्रवासाचे दिक्कालाच्या वेध लागुनी राहिले !!
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment